संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Assembly Budget 2024-2025) सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी एका महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्यता योजनेची घोषणा केली आहे.
वित्तमंत्री अजित पवार यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेची घोषणा करत असल्याचं पवार यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत २१ ते ६० या वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत. जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असून या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटींचा निधी दिला जाईल अशी घोषणा पवार यांनी केली. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तसेच महिलांसाठी 'पिंक ई-रिक्षा' योजना देखील जाहीर झाली आहे. या योजनेंतर्गत १७ शहरातील १० हजार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.