संग्रहित छायाचित्र
छत्रपती संभाजीनगर: रोज सकाळी भोंगा वाजतो. भोंगा कधीच कंटाळत नाही. कारण वस्तुस्थिती माहिती नाही, स्थानिक जनतेत कधी राहिलाच नाही तर कसे कळणार? संजय राऊत यांना आरोप करण्याशिवाय काहीही काम उरलेले नाही. सकाळी उठल्यावर ९ वाजता फक्त टीव्हीमध्ये येतो. एखादी निवडणूक जनतेतून निवडून दाखवावी म्हणजे कळेल, अशा शब्दांत खासदार संदीपान भुमरे यांनी राऊतांवर टीका केली आहे.
राज्यात अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने शेतकऱ्यांसह महिलांसाठी मोठ्या योजनांची बरसात केली आहे. याचा फायदा आता घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बिडकिनमधील सर्व सदस्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय राऊत यांना आरोप करण्याशिवाय काहीही काम उरलेले नाही. सकाळी उठल्यावर ९ वाजता फक्त टीव्हीमध्ये येतो. तुम्ही आमचा स्ट्राईक रेट बघा, आम्ही किती जागा लढल्या आणि त्यापैकी किती आल्या हे आधी बघा. त्यामुळे विधानसभेत नक्कीच आमच्या जागा निवडून येतील. मला थोडी उशिरा उमेदवारी मिळाली. तरी देखील मी दीड लाख मतांनी निवडून आलो असे यावेळी खासदार भुमरे यांनी सांगितले. संजय राऊत यांनी एखादी निवडणूक जनतेतून लढवून दाखवावी, असे माझे त्यांना चॅलेंज आहे. मागच्या दारातून कोणी येऊन काही बोलते याला काही अर्थ नाही, असा टोला यावेळी भुमरे यांनी लगावला.
या सर्व लोकांना माझा आधीचा अनुभव होता म्हणून ते पुन्हा शिवसेनेत परत आले आहेत. परवा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आणली आहे, शेतकऱ्यांसाठी आणि अन्य घटकांसाठी या सारख्या अनेक योजना आमच्या सरकारने आणल्या आहेत, असेही भुमरे यांनी म्हटले आहे. अजून बरेच धमाके होणार आहेत, माजी महापौर यांच्यासह अनेक जणांनी प्रवेश केलेला आहे. अजूनही प्रवेश होणार आहेत.
राज्य सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले. लोकसभेला जी परिस्थिती झाली, तिच आता विधानसभेला होणार असून सर्व जागा महायुतीच्या येणार आहेत. सरकारने २ हजार कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे.