निर्णय घ्या, अन्यथा २८८ उमेदवार; विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटलांचा इशारा

ओबीसी आंदोलनानंतर राज्यात अनेक भागात, बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा वादाला फोडणी घालण्याचे काम करण्यात येत आहे. सरकारने १३ जुलै रोजी 'सगेसोयरे'ची मागणी मान्य करावी अन्यथा राज्यातील सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करू, असा इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 1 Jul 2024
  • 01:25 pm
Maharastra News, maratha reservation

संग्रहित छायाचित्र

मराठ्यांनी मनावर घेतले तर राज्यात हिंडणे मुश्किल करणार

अंतरवाली सराटी: ओबीसी आंदोलनानंतर राज्यात अनेक भागात, बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा वादाला फोडणी घालण्याचे काम करण्यात येत आहे. सरकारने १३ जुलै रोजी 'सगेसोयरे'ची मागणी मान्य करावी अन्यथा राज्यातील सर्वच्या सर्व २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करू, असा इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

जातीयवाद कोण करते हे सर्वांना माहिती आहे. येवलावाल्याने सगळा माल जमवला आहे. १८ व्या शतकात मराठवाड्यात आरक्षण होते. मात्र आम्हाला स्वातंत्र्यानंतर आरक्षण दिले. ओबीसी हे का समजून घेत नाही. तुमच्या आधी आम्हाला आरक्षण मिळाले आहे. आमच्या ५७ लाख नोंदी रद्द करा म्हणत आहात. मग जातीवाद कोण करते आहे. 

आम्ही आंदोलन उभे केले की आमच्यापुढे तुम्ही ओबीसी आंदोलक बसवता. आम्ही मूक मोर्चे काढले आणि तुम्ही प्रतीमोर्चे काढले. आम्हालाही वाटते आमचा विकास झाला पाहिजे. आमच्याही लेकरांची स्वप्न आहेत. जातीवाद झाला म्हणून तुम्ही टोळके जमा करत आहात. आमची धमकी नाही, हे आमचे हक्क आहेत. तुम्ही तुमच्यात परिवर्तन करा. आम्ही एक आलो की जातीयवाद, तुम्ही एक आलात की घटनात्मक अधिकार, असा दुहेरी खेळ बंद करा, असे जरांगे म्हणाले आहेत.

त्या येवल्यावाल्याला सांगा...

ओबीसी आंदोलन हे येवलावाल्याचे षडयंत्र आहे.  येवलावाल्याने सगळा माल जमा केला. आमच्या आया-बहिणीवर हल्ला झाला. लेकराचे हाल बघून जागचे हलले नाहीत. आम्ही एक झालो तर तुमच्या पोटात दुखते. आमचे आंदोलन सुरू असताना अंबड येथे सभा का घेतली? कोण करतेय जातीवाद, असा सवालही  त्यांनी केला. त्या येवलावाल्याला सांगा नीट राहा, आमच्या वाट्याला जाऊ नको, अशा शब्दांत जरांगेंनी भुजबळ यांचा समाचार घेतला.

आम्ही मनावर घेतले तर वाट लागेल

मराठ्यांनी मनावर घेतले तर निवडणूक काळात राज्यात काहीही होऊ शकते. राज्यात मराठे ५५ टक्केच्या वर आहेत. आमची जात काढू नका. तुम्ही मनगट दाखवण्याची भाषा करू नका. मनगट गाजवणे मराठ्याच्या रक्तात आहे. ओबीसी बांधवांनी शांतता बाळगावी. तुमचे नेते तुमच्यासोबत खोटे बोलत आहेत. तुमच्या आधी मराठ्यांना आरक्षण आहे. १३ तारखेला निर्णय घ्या अन्यथा २८८ मधील एकही निवडून आणू देणार नाही. मी धोका कधी करत नाही. मी खोटे बोलत नाही. आरक्षण दिले नाहीत तर पाडायचे की निवडून आणायचे हे मी सांगेन. मी नाव घेऊन पाडा असे सांगेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.वृत्तसंंस्था

मेटेंचे स्वप्न नक्की पूर्ण करणार

गोरगरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे असे विनायक मेटे यांचे स्वप्न होते. मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी संघर्ष केला आहे. मराठा समाज त्यांना कधीही विसरणार नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी समाजाच्या खांद्यावर आहे. कोणीही मागे हटायचे नाही. १०० टक्के मराठा मोठा करायचा आहे, म्हणून ही लढाई आहे. मेटे यांची जयंती आहे, मी खोटे बोलणार नाही. जातीवाद केला नाही आणि कधी करणार देखील नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest