दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगचा मुद्दा पेटला, विरोधात आंदोलन

नागपूर: येथील दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला असून नागरिकांनी पार्किंग विरोधात केलेल्या आंदोलनावेळी बांधकामाची तोडफोड केली आहे. भूमिगत पार्किंगमुळे स्तुपाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा करून नागरिकांनी आंदोलन केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 2 Jul 2024
  • 12:21 pm
Dikshabhumi, Nagpur, Dikshabhoomi, Underground Parking, Devendra Fadanvis

संग्रहित छायाचित्र

जनभावना लक्षात घेऊन बांधकामाला सरकारची स्थगिती

नागपूर: येथील दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला असून नागरिकांनी पार्किंग विरोधात केलेल्या आंदोलनावेळी बांधकामाची तोडफोड केली आहे. भूमिगत पार्किंगमुळे स्तुपाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा करून नागरिकांनी आंदोलन केले. संतप्त जमावाला शांतता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अखेर राज्य सरकारने बांधकामाला स्थगिती देण्याचा निर्णय विधानसभेत जाहीर केला.  

या संवेदनशील प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दीक्षाभूमी येथे कोणतीही पार्किंगची मागणी नसताना स्मारक समितीने त्याचा घाट घातला. या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. स्मारक समितीने लोकांच्या भावनेशी खेळू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच आमचाही पार्किंगला विरोध असून आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी असल्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या संदर्भात भाष्य केलं आहे. विधिमंडळ परिसरात ते म्हणाले, दीक्षाभूमी हा जनतेच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा आदर करून दीक्षाभूमीचा विकास करावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

फडणवीसांचे निवेदन 

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर करताना जनभावना लक्षात घेऊन बांधकामास स्थगिती देण्यात येत असल्याची  माहिती दिली. फडणवीस म्हणाले, बांधकामाचा आराखडा स्मारक समितीने मंजूर केला असून राज्य सरकारने बांधकामासाठी केवळ निधी दिला आहे. त्यानुसार बांधकाम सुरू आहे. मात्र, काही नागरिकांकडून आंदोलन सुरू आहे. तथापि लोकभावना लक्षात घेता, आता या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या प्रकरणी लवकरच आंदोलक आणि स्मारक समितीची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest