संग्रहित छायाचित्र
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर विरोधकांनी त्यावर टीका केली आहे, तर सत्ताधारी नेत्यांनी त्याचे समर्थन करत विरोधकांना धारेवर धरले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले, सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा हा खोटा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत हे खोटं नॅरेटिव्ह आहे. या योजनांसाठी आर्थिक तरतूद कशी करणार, याचा त्यात उल्लेख नाही. त्यांनी आजपर्यंत ज्या घोषणा केल्या, त्यातल्या किती पूर्ण झाल्या, यावर तज्ज्ञांची एक समिती नेमून विधानसभा निवडणुकांच्या आधी त्यावर श्वेतपत्रिका जाहीर करावी. ठाकरे म्हणाले, “गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने जनतेला खोटी आश्वासनं दिली, त्यांच्या खोट्या आश्वासनांना, थापांना कंटाळून महाराष्ट्रातील जनतेने भाजपासह त्यांच्या मित्र पक्षांना लोकसभा निवडणुकीत दणका दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला फसवण्यासाठी हे लोक नव्या आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. मात्र जनता थापांवर विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र रचले आहे. आर्थिक विकासाबाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या मागे राहिल्याची गोष्ट जनतेला माहिती आहे. महाराष्ट्राला लुबाडायचं आता चालणार नाही. महाराष्ट्र आता जागा झाला आहे.
ठाकरे म्हणाले, अर्थसंकल्पातून महिलांना आपल्या बाजूने वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. ‘लाडकी बहीण’ अशी योजना जरूर आणावी. मात्र, मुलगा आणि मुलगी असा भेद करू नये. मुलांसाठीही एखादी योजना आणा. त्याबद्दल अर्थसंकल्पात कुठेही उल्लेख नाही. लाखो तरुण बेरोजगार असताना त्यांच्यासाठीही काहीतरी करावं. रोजगार वाढीसाठी कोणत्याही उपाययोजना दिसत नाहीत.
'लाडका बेटा' योजनेचे काय?
हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून सर्वांसाठी घोषणा केल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी घोषणा आहे. १५०० रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होणार. आम्ही लाडका भाऊ योजनाही आणली. आम्हाला नावं ठेवणाऱ्यांनी लाडका बेटा योजना अडीच वर्षे राबवली त्याचं काय? अजित पवारांचा अर्थसंकल्प आहे. दादा वादे का पक्का है असेही मुख्यमंत्री म्हणाले.
औरंगजेब, मेमन अन्...
अर्थसंकल्प पाहून त्यांचे चेहरे पांढरे पडले आहेत. आम्ही जे काम केलं आहे त्याची पोचपावती लोकं आम्हाला देतील. औरंगजेब, याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले त्यांना चादरीशिवाय काय दिसणार? लोकसभा निवडणुकीत काय मिळवलं? मोदींना हटवण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण मोदी पंतप्रधान झाले. तुम्ही ४० वरून ९९ वर पोहचले. त्याचे वेड्यासारखे पेढे कसले वाटता? असा बोचरा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारला.
प्रकरण पुढे जायचंच नाही
अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला. ते म्हणाले, आपल्या वेळी प्रकरण पुढे जायचंच नाही. येत्या दोन वर्षांत ६१ प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असून त्यातून ३ लाख ६५ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौरपंप या योजनेतून ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना असे पंप उपलब्ध करून देणार आहे.