निष्ठा वगैरे, काही गोष्ट आहे की नाही?, ते स्वत:चे नाहीत, तुमचे काय होणार?
मुंबई : निवडणुकीसाठी जागा वाटप चर्चा सुरू आहे. प्रत्येक वेळी विचारावं लागतंय की हा नेता आता कुठे आहे. निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते, हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय होणार. अशी राजकीय अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली असल्याचे मत व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर टीका केली. गोरेगाव येथे नेस्कोत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी विविध घटनांवर भाष्य करत शरद पवार यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखे वाघनखे काढतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पण्यांना उत आला असून मनसेनेही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यातून राज ठाकरे यांनी सुरुवात केली.
राज ठाकरे म्हणाले, कालचा दसरा मेळावा पाहिला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखे वाघनखे काढतात, येथून अफजल आला, शाहिस्तेखान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे पुष्पाचं वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे, मै आयेलाय असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. ते म्हणाले, मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही. कोण निवडून आला, कोणाला मतदान केलं, सध्या ते काय करतात अशा पद्धतीचा महाराष्ट्र कधी पाहिला नाही. मला कळेच ना काय सुरू आहे?
राज ठाकरे म्हणाले, शरद पवार सांगत आहेत की, आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? आणि मी आता अजित पवारांबद्दल बोलतच होतो. आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहिती नाही. भाजपा यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार भाजपात यायच्या ८ दिवस अगोदर मोदी म्हणाले होते की, ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकू. जेलमध्ये टाकण्याऐवजी त्यांना मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय?
शरद पवार नास्तिक आहेत
शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, शरद पवार नास्तिक आहेत, असं खुद्द त्यांची लेक सुप्रिया सुळेंनी लोकसभेत सांगितलं होतं. मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा ते सर्व मंदिरात जाऊन पाया पडायला लागले. त्यांचे हे पाया पडणंही खोटं आहे.
सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही? गद्दारी करणारा प्रत्येकजण तुम्हाला का आवडतो? असेही राज ठाकरे म्हणाले. वृत्तसंंस्था