के. चंद्रशेखर राव यांचे टार्गेट मराठवाडा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे रूपांतर भारत राष्ट्र समितीत केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 25 Apr 2023
  • 06:00 am
के. चंद्रशेखर राव यांचे टार्गेट मराठवाडा

के. चंद्रशेखर राव यांचे टार्गेट मराठवाडा

राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती करणार छत्रपती संभाजीनगरात शक्तिप्रदर्शन

#छत्रपती संभाजीनगर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे रूपांतर भारत राष्ट्र समितीत केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

राव यांच्या पक्षाचे काही नेते मराठवाडा आणि सोलापूरच्या परिसरात ठाण मांडून बसले आहेत. नांदेड जिल्ह्यात दोन सभा घेतल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरकडे वळवला आहे. राव यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली असली तरी त्यांनी कर्नाटकात निवडणूक लढविण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. तेथील स्थानिक पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर लक्ष दिल्याने त्यांना मराठवाड्याचे इतके आकर्षण का आहे, असा सवाल नागरिकांना पडला आहे. तर दुसरीकडे भाजपने त्यांना मतविभाजन करण्यासाठी मराठवाड्यात आणल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरात बीआरएसचे प्रमुख तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सभेसाठी शहरात सर्वत्र पोस्टर्स, पताका, गुलाबी ध्वज फडकत असल्याने शहरवासीयांचे ते लक्ष वेधून घेत आहेत.

राव यांचे अवघे ९ लोकसभा सदस्य, ६ राज्यसभा सदस्य आणि त्यांच्या राज्यात सुमारे १३६  आमदार आहेत. या जोरावर ते महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध कसे करणार, असा प्रश्न अनेकजण विचारत असले तरी केसीआर यांनी एकट्याच्या नेतृत्वावर तेलंगणा राज्य निर्माण करण्याची किमया साधली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

राव हे गेली ९ वर्षे राज्याचे नेतृत्व करत आहेत. याच काळात त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुलगा के. रामाराव यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देत आपण राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हायचे, असा त्यांचा मानस आहे. याच दृष्टीने त्यांनी तेलंगणाला लागून असलेल्या आणि आपल्या राज्यातील थोडी फार नाती गोती असलेल्या नांदेड आणि लोहा विधानसभा मतदारसंघात चाचपणी केली. यावेळी तिथे पक्षाला मिळालेल्या राजकीय पाठिंब्यामुळे त्यांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता शिंदे गट-भाजप एकत्र निवडणूक लढणार आहे, तर त्यांचा मतदार हा मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय आहे. मविआत काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवणार आहे. यात दलित आणि मुस्लीम मतदार मविआकडे आकर्षित होत आहे. केसीआर यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या मतदारांचा फटका बसणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

एमआयएमने जसे नांदेड आणि मग छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले पाय रोवले, ते ओळखून राव यांनी पक्षविस्तार करण्यासाठी मराठवाड्याची निवड केली. यातच त्यांना मराठवाड्यात अनेक माजी आमदार आणि माजी खासदारांसह माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने राव यांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest