अध्यक्षपदासाठी जयंत पाटील योग्य
#मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्याने पक्षाचे अध्यक्षपद रिकामे झाले आहे. त्यामुळे पक्षाचे भावी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच चर्चेतील ही दोन नावे वगळून तिसराच कोणीतरी अध्यक्ष होईल असेही बोलले जात आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खुद्द पवार कुटुंबातूनच अजित पवार यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पसंती असल्याचे समोर आले आहे. जयंत पाटील अध्यक्षपदासाठी जास्त योग्य आहेत, असे मत शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत त्या म्हणाल्या, शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडले असल्यामुळे आता ते अन्य जबाबदार व्यक्तीकडे सोपवावे लागेल. त्या दृष्टीने मला जयंत पाटील हे जास्त योग्य वाटतात. जयंत पाटील हे विदेशात शिकलेले आहेत. त्यांचा अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचा चांगला अभ्यास आहे. त्यांच्याकडे जबाबदारी सोपवल्यावर त्यांना थोडे अधिक वेगाने काम करायला लागेल.
जयंत पाटील म्हणतात…
दरम्यान, शरद पवार यांनी विधानसभा निवडणुका होईपर्यंत अध्यक्षपदी कायम राहावे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली आहे. तसेच, जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याला पक्षाच्या अध्यक्षपदात रस नसल्याचे स्पष्ट करताना आपण या शर्यतीत नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.