संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जाणार असून तशी वेगवेगळी जाहिरात देखिल प्रसिध्द करण्यात आली आहे. या पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यास प्रशासनाने नऊ उशीर केला. प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार एमपीएससीने विद्यार्थ्यांची वयोमर्यादेची अट अनिवार्य आहे. यामुळे पोलीस उपनिरीक्षक पदाची (पीएसआय) तयारी करणारे सुमारे ५० ते ६० हजार विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे. केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या विद्यार्थ्यांचे स्वप्न अपूर्ण राहणार असल्याने एमपीएससीने स्वायत्त संस्था असलेल्या दर्जाचा वापर करत विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी पीएसआय पदाची तयारी करतात. गाव सोडून पुण्यासारख्या शहरात महिन्याला १० ते १५ हजार रुपये खर्च करुन तयारी करत असतात. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने सूचना देवून प्रशासनाने रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससीला उशीरा पाठवले. त्यामुळे नऊ महिने ही जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. जाहिरात उशीरा आल्याने उमेदवाराच्या पात्रता निकषात वयोमर्यादा हा महत्वाचा मुद्दा आहे. दिलेल्या वयोमर्यादेत एक दिवस जरी जास्त असला तरी संबंधित विद्यार्थ्यांला अपात्र केले जाते. या निकषामुळे राज्यातील ५० ते ६० हजार विद्यार्थी या पद भरतीला मुकणार आहेत. या विद्यार्थ्यांची संधी केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हिरावून घेतली जाणार आहे. त्यामुळे आपले अपूर्ण स्वप्न घेवून पुन्हा घरी कसे जावे असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे. सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे लोकप्रिय निर्णय घेता येत नाही. असे कारण प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पंरतु देशाच्या घटनेच एमपीएससीला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे याचाच आधार घेत एमपीएससीने वयोमर्यादेत वाढ केली तर आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही. तसेच याबाबत एमपीएससीने कायदेशीर सल्ला आणि निवडणूक आयोगाकडे विनंती केल्यास नक्कीच असा निर्णय घेता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पीएसआय पदासाठी वय मोजताना १ फेब्रवारी २०२५ पर्यंत मोजले जाणार आहे. परंतु मुळातच ही जाहिरात उशीरी आली आहे. त्यामुळे वयोमर्यादा मोजताना विचार करावा असे विद्यार्थ्यांची म्हणणे आहे. वय मोजण्याच्या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांची केवळ दोन ते तीन महिन्यांच्या फरकामुळे संधी हुकणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससी तसेच सरकारकडे वयोमर्यादेबाबत अर्ज , विनंती देखिल केली आहे. पंरतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
खुल्या प्रवर्गासाठी ३१, मागास प्रवर्गासाठी ३४ तर खेळाडूसाठी ३६ वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सरकारी दिरंगाई झाल्यामुळेच विद्यार्थ्यांची संधी हुकणार आहे, ही विद्यार्थ्यांची नव्हे तर सरकारची चुक आहे, त्यामुळे वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी सीविक मिररशी बोलताना केली आहे.
गेल्या दहा वर्षात सर्वात कमी पदासांठी पीएसआय पदासाठी जाहिरात प्रसिध्द केल्याने विद्यार्थ्यांनी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. तसेच या पदासाठी वयोमर्यादा गृहीत धरण्याच्या अटीवर देखील नाराजी व्यक्त केली आहे. जून २०२४ मध्ये होणारी हीच परीक्षा आता फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहे. आता या परीक्षेची प्रक्रिया तब्बल दीड वर्ष चालणार आहे. पीएसआय या पदासाठी राज्यात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी तयारी करतात. त्यामुळे सरकारकडून दरवर्षी मोठ्या पदांसाठी भरती जाहिर केली जाते. मात्र यंदा केवळ २१६ पदांसाठीच ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एमपीएससी आणि सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब व गट - क सेवा परीक्षेच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिध्द केल्या आहेत. गट- ब साठी ४८० रिक्त पदांसाठी तर गट- क च्या १३३३ रिक्त पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्य सरकारने मेगा भरती जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या तोंडावर निर्णय घेत राज्यसरकारने टाईमींग साधला असून लाखो विद्यार्थ्यांची नाराजी दूर केली आहे.
दरम्यान, एमपीएससीद्वारे मागील नऊ महिन्या पासून प्रलंबित असणारी गट ब पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनुसार सहायक कक्ष अधिकारी ५५ पदे, राज्य कर निरीक्षक- २०९, पोलीस उपनिरीक्षक- २१६ अशा एकूण ४८० रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ही परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. १४ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उद्योग निरीक्षक- ३९, कर सहायक- ४८२, तांत्रिक सहायक - ९, लिपिक-१७, लिपिक- टंकलेखक - ७८६ अशा एकूण - १३३३ रिक्त पदांसाठी परीक्षा घेतील जाणार आहे. ही २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. १४ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे.
एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षाची जाहिरात नऊ महिने उशीरा आल्यामुळे हजारों विध्यार्थी अपात्र झाले आहेत. यामुळे किमान दोन वर्ष वयोमर्यादेत वाढ एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात जाहीर झाली आहे. एमपीएससीच्या वेळापत्रकानुसार ठरलेल्या वेळेत जाहिरात प्रसिध्द न झाल्यामुळे ती नऊ महिने वर्ष उशीरा आली. त्यामुळे सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे तसेच विद्यार्थीचे पीएसआय होण्याचे स्वप्न अपूर्ण राहत आहे. वयोमर्यादेत किमान दोन वर्षे वाढ करून सर्वाचे स्वप्न पूर्ण करावे.
- महाराष्ट्र राज्य विध्यर्थी समन्वय समिती