मठातला एक माणूस आणून लोक जवळ कसे येतील ?
#बीड
भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या बातम्या येत असतात. पक्षाच्या एका कार्यक्रमात मुंडे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत आपली नाराजी व्यक्त केली आहे. गहिनीनाथ गडावर गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना पंकजा यांनी, मठातला एखादा माणूस जवळ घेऊन लोक जवळ आले, असा आविर्भाव कसा काय आणता येईल? मनात स्वार्थ असेल तर लोक जवळ येऊ शकत नसल्याचा दावा केला आहे.
रविवारी बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणी बैठक मुंडे यांनी घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. कार्यकर्त्यांनो कामाला लागा. तुमच्या आणि माझ्या संघर्षाला सोन्याचे दिवस येतील. आपण आपला हक्क हात आपटून घेऊ, असे थेट आव्हान पंकजा मुंडे यांनी दिले आहे. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री असले तरी ते देशातील प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीच्या प्रचाराला जातात. जेव्हा ते प्रचाराला जातात तेव्हा ते संघटना म्हणून जात असतात. जेव्हा ते निर्णय घेतात. तेव्हा ते देशाचा प्रथम नागरिक म्हणून निर्णय घेत असतात. असा नियम आमदार, खासदारांना देखील असला पाहिजे. सध्या कुठल्याच निवडणुका होईनात, नगरपालिका निवडणूक होत नाही, जिल्हा परिषद होत नाहीत, मात्र ग्रामपंचायत होत आहेत. मला असे वाटते आहे, गावा-गावात युद्ध सुरू झाले आहे. मात्र पुढे असे होणार नाही, असे म्हणत निवडणुकांवरून पंकजा मुंडे यांनी राज्यातील भाजपला घरचा आहेर दिला आहे.वृत्तसंस्था