विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार शिगेला आलेला असतानाच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकसानी पोटी २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपयांची जबाबदारी ३५ जणांवर निश्चित केली आहे. जबाबदारी निश्चित झालेल्या माजी संचालकामध्ये जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. चौकशी अधिकारी डॉक्टर किशोर तोष्णीवाल यांनी चौकशीचा अहवाल विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकडे सादर केला आहे.
जबाबदारी निश्चित झालेल्या नावांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार शिद्राबा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जबाबदारी निश्चित केलेल्या नावामध्ये सर्व राजकीय पक्षांचे नेते आहेत. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालावरून ही प्रक्रिया झाली आहे. बँकेच्या नुकसानीची जबाबदारी माजी संचालक अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्यावर निश्चित करण्यासाठी डॉक्टर तोष्णीवाल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.
रक्कम वसूल देण्यासाठी विभागीय सहनिबंधक सुर्वे हे पुढील प्रक्रिया करणार आहेत. ही प्रक्रिया केव्हा सुरू होणार, विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर का लगेच या प्रक्रियेचा काही परिणाम निवडणू कीवर होईल का याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. बँकेचे माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वसुलीसाठी जबाबदारी निश्चित केली.
जबाबदारी खालीलप्रमाणे
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर ३ कोटी पाच लाख ५४हजार रुपये, माजी मंत्री दिलीप सोपल ३० कोटी २७ लाख २८ हजार, माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे वारसदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर ३ कोटी १४ लाख ६५ हजार रुपये, आमदार बबनराव शिंदे यांना ३ कोटी ४९ लाख २३ हजार, आमदार संजय शिंदे यांच्यावर ९ कोटी ८४ लाख ४४ हजार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ५५ लाख ५४ हजार, माजी आमदार राजन पाटील ३ कोटी ३४ लाख २१ हजार, माजी आमदार दिलीप माने ११ कोटी ६३ लाख ३४ हजार, माजी आमदार दीपक साळुंखे २० कोटी ७२ लाख ५१ हजार, माजी आमदार सिद्धाराम आप्पा पाटील १६ कोटी ९९ लाख ८० हजार, माजी आमदार जयवंतराव जगताप ७ कोटी ३० लाख २ हजार रुपये, माजी आमदार कैलासवासी सांगोजराव देशमुख यांचे वारसदार पांडुरंग देशमुख १ कोटी ५१ लाख २१ हजार, माजी आमदार एस. एम. पाटील यांचे वारसदार सुरेश पाटील व अनिल पाटील ८ कोटी ७१ लाख, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे वारसदार प्रभाकर परिचारक ११ कोटी ८३ लाख ६ हजार, नेते चंद्रकांत देशमुख ८ कोटी ४१ लाख २९ हजार, रामचंद्र वाघमोडे वारसदार प्रकाश वाघमोडे व संजय वाघमोडे १ कोटी ४८ लाख ६७ हजार सुरेश हसापुरे ८ कोटी ३ लाख ७ हजार, बबनराव अवताडे ११ कोटी ४४ लाख ८१ हजार, राजशेखर शिवदारे १ कोटी ४८ लाख ६७ हजार, अरुण कापसे २० कोटी ७४ लाख ७८ हजार, संजय कांबळे यांचे वारसदार जयश्री कांबळे व संतोष कांबळे ८ कोटी ४१ लाख २९ हजार, भैरू वाघमारे ४ कोटी ४१ लाख २९ हजार, सुनील सातपुते ८ कोटी ४१ लाख २९ हजार, रामदास हक्के ८ कोटी ४१ लाख २९ हजार, कल्याण अभिवंत यांचे वारसदार चांगदेव अभियंते, कमल अभिवंत, सुधाकर अभिवंत, सुनील अभिवंत १ कोटी ५१ लाख २१ हजार, भरतरी नाथ अभंग १ कोटी ५१ लाख २१ हजार, विद्या बाबर १ कोटी ५१ लाख २१ हजार, सुनंदा बाबर १० कोटी ८४ लाख ७२ हजार, रश्मी बागल ४३ लाख २६ हजार, नलिनी चंदले ८८ लाख ५८ हजार, सुरेखा ताटे १ कोटी ५१ लाख २१ हजार, सुनीता बागल १ कोटी ५१ लाख २१ हजार, किसन मोठे ५ लाख, के. आर. पाटील ५ लाख, सीए संजीव कोठारी ९१ लाख १२ हजार रुपये अशी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.