सोलापूर शहरात व जिल्ह्यात भाजपचे सहा उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ नोव्हेंबर रोजी सोलापूर दौरा येणार असून त्यावेळेस अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे दिसते.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. या काळात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रेवर भर दिल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक उमेदवार रोज दोन किंवा तीन पदयात्रा आणि गाव भेट-दौरा करत आहेत. मोठ्या सभेची तयारी आणि मतदारांना एकत्र करण्यात दोन दिवस खर्ची पडतात. त्यामुळे पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या सभा घेण्याचे उमेदवार टाळत आहेत.
प्रचाराच्या पाच दिवसांत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांची सभा आणि महायुतीकडून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची सभा तसेच जयंत पाटलांची सभा शहर उत्तर आणि मध्य मतदारसंघात झाली. शहर उत्तर मतदारसंघात आणि दक्षिण सोलापुरात महायुतीकडून भाजपचे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी (शरद पवार ) असे प्रत्येकी एक उमेदवार आहे. प्रचारासाठी दहा दिवस शिल्लक आहेत.
शेवटच्या टप्प्यात मोठ्या नेत्यांच्या सभा
प्रचाराच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात जाहीर सभा होतील. यापुढे भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, माधवी लता, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, पाशा पटेल, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, संजय राऊत राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सभा होतील. मोठ्या नेत्यांच्या सभेची तयारी करण्यासाठी वेळ जातो. मतदारांना सभेत आणणे, त्यांची सोय करणे यासाठी येणारा खर्च पाहता पहिल्या टप्प्यात जाहीर सभा घेणे टाळण्यात येत आहे. मंडप, स्पीकर, खुर्च्या, हार-झेंडे फलक लावल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाने दर निश्चित केले असून यामुळे खर्चात वाढ होते. त्यामुळे जाहीर सभा घेणे टाळले जात आहे.
मोदींच्या सभेसाठी महाडिक यांनी घेतली बैठक
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सोलापूर देणार आहेत. येथील मैदानावर दुपारी त्यांची सभा होणार आहे. त्यासाठी भाजपकडून तयारी सुरू आहे. सोलापूरच्या समन्वयक खासदार धनंजय महाडिक यांनी सभेच्या तयारीबाबत आढावा बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत मोदी यांची सभा झाली होती. त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत नियोजन करण्याचे ठरले आहे. प्रचार सभेपूर्वी मतदारापर्यंत पोहोचणे, सभेच्या ठिकाणचे नियोजन याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची सांगण्यात आले आहे. सभेसाठी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शहाजी पवार, अविनाश महागावकर परिश्रम घेत आहेत.