संग्रहित छायाचित्र
सोलापूर : लसणाचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या मध्य प्रदेश व राजस्थान येथे अति पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची आवक पुन्हा कमी झाली आहे. त्यामुळे एका आठवड्यात दरात प्रति किलो चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. सध्या लसणाचे दर प्रति किलो ३४० रुपयांवर पोहोचले आहेत.
सोलापूरच्या मार्केट यार्डात ३४० रुपये प्रति किलोने विक्री होणार लसुन किरकोळ बाजारात ४५० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. सोलापूर बाजार समिती ही कांद्याप्रमाणे लसणाचीही मोठी बाजारपेठ आहे. प्रत्येक आठवड्याला चार ट्रकमधून बाराशे पोती लसणाची आवक होत असते परंतु मागील तीन महिन्यांपासून लसणाची आवक कमी झाली आहे. बाजार समितीत आठवड्यातून एकदा दोन ट्रकमधून सहाशे पोटी एवढी लसणाची आवक होत आहे. किरकोळ बाजारात सरासरी २५० रुपये किलोने लसणाची आवक होऊन विक्री होते. यावर्षी उत्पादन कमी असल्याने नव्या लसणाची आवकही कमी आहे. मागील वर्षी उत्पादित झालेल्या जुन्या आणि साठवणुकीतील लसणाची सर्वाधिक आवक सुरू असल्याचे सांगण्यात आले. लसणाची मागणी वाढली आहे. मागच्या आठवड्यात सरासरी २३० रुपये किलो दराने उच्च प्रतीचा लसूण तीनशे रुपये किलो विकला जात होता. मागणी वाढल्याने उच्च प्रतीच्या लसणाचे दर ३४० रुपयांवर पोहोचले आहेत.