फडणवीसांना त्यांची जागा दाखवणारच; मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा
#अंतरवाली सराटी : देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण मराठ्यांचे वैर अंगावर घेतले असून ज्या मराठ्यांनी त्यांना १०६ आमदार निवडून दिले, त्याच मराठ्यांच्या मुलांचे मुडदे पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. मनोज जरांगे यांनी मंगळवारी (दि. १५) पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील. खरे तर मराठ्यांना राजकारणात जायचे नाही. मात्र, देवेंद्र फडणवीसाच्या मराठाद्वेषीपणामुळे आम्हाला नाईलाजाने राजकारणात यावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावे की, अजूनही वेळ गेलेली नाही. आचारसंहिता पुढे दोन चार दिवस पुढे ढकलून आमच्या मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, आम्हाला राजकारणाशी देणेघेणे नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारने कुणाचीही मागणी नसताना १६-१७ जातींचा समावेश ओबीसीत केला. त्यांना आरक्षण दिले. मराठ्यांना डिवचण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला, आम्ही तुम्हाला आरक्षण देत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, हे सांगण्याचा प्रयत्न एकप्रकारे सरकारने केला. पण याचे परिणाम आता वाईट होतील. मग सरकरला पश्चात्ताप करायची संधीही मिळणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
अंगावर आले त्यांची माती झाली
मराठ्यांवर अन्याय करून तुम्ही सत्ता काबीज करायला बघत असाल, तर हा त्यांचा गैरसमज आहे. आजपर्यंत जो कुणी मराठ्यांच्या नादी लागला आहे. त्याचा बिमोड करण्याचं काम मराठ्यांनी केलं आहे. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. अन्यथा मराठा समाज तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण मराठ्यांचे वैर अंगावर घेतले आहे. ज्या मराठ्यांनी यांना १०६ आमदार निवडून दिले, त्याच मराठ्यांच्या मुलांचे मुडदे पाडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
अजूनही वेळ गेलेली नाही
आमच्या मागण्यांची अजून वेळ गेलेली नाही. सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण तुमची सत्ता तुम्हाला लखलाभ असो. मला आणि माझ्या मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही, पण तुम्ही जर मराठ्यांवर दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असताल. जर तुम्ही आमची वाट लावायला चालले तर माझे मराठे तुमची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तुमच्या हातात अजूनही वेळ आहे. तुम्ही आचारसंहितेची तारीख पुढे ढकलून मराठ्यांना न्याय देऊ शकता, असे मनोज जरांगे म्हणाले. जसे तुम्ही आता कोणाचीही मागणी नसताना १६-१७ जाती आरक्षणात घातल्या. तेही मराठ्यांना छेडून आणि मराठ्यांना खवळून त्यांनी घेतले. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. ही जी खुन्नस दिली, त्याचे परिणाम इतके वाईट होतील की तुम्हाला पश्चात्ताप करायला वेळ राहणार नाही, अशा शब्दात जरांगेंनी इशारा दिला आहे.