संग्रहित छायाचित्र
मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सध्या राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील या वादाने राज्यभर गाजला आहे. मोहोळमध्ये अजित पवार गटाचे आमदार यशवंत तात्या माने उमेदवारीसाठी इच्छुक असून येथे बदल घडवण्यासाठी यावेळी राजू खरे हा नवीन चेहरा शरद पवार देण्याच्या तयारीत आहेत. मोहोळ तहसीलचे उपकार्यालय अनगर येथे हलवल्यानेच मोहोळमध्ये तीव्र असंतोष होता आणि यातूनच राजन पाटलांना सध्या टोकाचा विरोध सुरू झाला आहे. अजित पवार यांनी पुन्हा मोहोळची जागा जिंकण्यासाठी विद्यमान आमदार राजन पाटलांचे स्नेही यशवंत तात्या माने यांनाच तिकीट देण्याचे ठरवले आहे.
यामुळे सध्या शरद पवार यांच्याकडे तिकिटाची मागणी करणाऱ्यात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले संजय क्षीरसागर , माजी आमदार रमेश कदम आणि राजू खरे ही तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत. संजय क्षीरसागर हे राजन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून यापूर्वी पराभूत झाले होते. या मतदारसंघातून दुसरे इच्छुक माजी आमदार रमेश कदम हे अनेक वेळा वादग्रस्त ठरले असून त्यांच्यावर काही केसेस सुरू असल्याने शरद पवार नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत. यातूनच मूळ पंढरपूरचे असणारे आणि सध्या मुंबईत स्थायिक झालेले उद्योगपती राजू खरे यांचे नाव पुढे आले आहे.
युवा सेनेपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे राजू खरे हे नंतर उद्योगानिमित्त मुंबईत गेले आणि तेथेच स्थायिक झाले. गेल्या वेळी विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती मात्र त्या वेळेला त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी धीर न सोडता याच मतदारसंघात रस्ते ,पाणी, आरोग्य ,शिक्षण अशा क्षेत्रात काम करत राहिले. दुष्काळादरम्यान खरे यांनी मोहोळ शहर, मोहोळ ग्रामीण आणि उत्तर सोलापूर या भागात स्वखर्चाने पाणी टँकर सुरू केले होते. याचसोबत मागेल तिथे रस्ता, मागेल त्याला बोअरवेल अशा रीतीने लोकांशी संपर्क वाढवत त्यांनी विधानसभेसाठी पेरणी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात खरे यांनी अनेक शाळांना मदत करताना विविध कंपन्यांचे सीएसआर फंड देऊ केले होते. मोहोळ परिसरातील आजारी रुग्णांना रोख स्वरूपाची मदत करीत त्यांनी गावोगावी आपली ओळख निर्माण केली होती. सण उत्सव काळात विविध तरुण मंडळांनाही ताकद दिल्याने सध्या खरे यांची तरुणात मोठी क्रेझ तयार झालेली आहे.
मोहोळ मतदारसंघात साधला जाईल जातीय समीकरणाचा तोल?
मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर अशा तीन तालुक्यांचा मिळून बनला असून गेल्या वेळेला विजयी झालेले यशवंत माने यांना साडेसात हजारांची आघाडी पंढरपूर तालुक्यातून मिळाली होती. मोहोळ मतदारसंघात जवळपास एक लाख ८० हजार मतदान मोहोळ शहर व तालुक्याचे असून पंढरपूरचे ६० हजार तर उत्तर सोलापूरचे ८५ हजार मतदान आहे. या मतदारसंघात मोहोळ तालुक्यातील राजन पाटील गट विरुद्ध सर्व असे चित्र सध्या तयार झाले असून उत्तर सोलापूरमध्ये शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांची ताकद आहे. अशा परिस्थितीत विद्यमान आमदारांना पराभूत करण्यासाठी राजन पाटील यांच्या विरोधात असलेली लाट आणि पंढरपूर व उत्तर सोलापूर या मतदारसंघाची गोळाबेरीज करून येथे विजय मिळवणे शक्य असल्याचे गणित सध्या शरद पवार मांडत आहेत. यासाठीच राखीव असलेल्या या मतदारसंघात पहिल्यांदाच नवबौद्ध असणाऱ्या राजू खरे यांना उमेदवारी दिल्यास जातीय समीकरणाचा समतोल साधता येणार आहे.