पवार-अदानी भेटीचीच चर्चा
# मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यात गुरुवारी झालेल्या दीर्घ बैठकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बंद दाराआड झालेली ही चर्चा तब्बल दोन तास सुरू होती. विशेष म्हणजे या बैठकीला दोघांशिवाय अन्य कोणीही उपस्थित नव्हते. चर्चेचा तपशील पूर्णपणे गोपनीय ठेवला असून बैठक झाली याशिवाय कोणतीही माहिती प्रसार माद्यमांकडे उपलब्ध नव्हती.
गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास गौतम अदानी हे काळ्या रंगाच्या कारमधून सिल्व्हर ओकवर आले. त्यानंतर बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा झाली. गौतम अदानी यांच्या उद्योगसमूहातील गुंतवणुकीबद्दल हिंडेनबर्गने अहवाल दिल्यानंतर प्रचंड खळबळ माजली होती. हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं होतं. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देश-परदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्याने राजकीय वातावरण तापले होते. त्यातच मोदी किंवा भारतीय जनता पक्षाने यावर अवाक्षरही काढले नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या कारवाया तीव्र झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द होण्यामागे आणि त्यांना राजधानीतील निवासस्थान खाली करण्यामागे अदानी प्रकरणच असल्याचा सर्वांचा अंदाज होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी अहमदाबादमध्ये शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गौतम अदानी यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. तसेच अलीकडेच अदानी यांनी बारामतीला भेट दिली होती. या भेटीवेळी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यानी अदानी यांच्या गाडीचे सारथ्य केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती.
त्यानंतर शरद पवार यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत संसद अधिवेशन, अदानी आदी अनेक मुद्यांवर भाष्य केले होते. मुलाखतीत पवार म्हणाले की, उद्योगसमूहांची देशाला गरज आहे. या समूहांनी बेकायदा किंवा काही चुकीचे केले असल्याचे पुरावे असतील तर टीका करण्याचा हक्क लोकशाहीत आहे. पुरावे नसल्यास आरोप करणे चुकीचे आहे. काँग्रेसने आग्रह धरलेल्या संयुक्त संसदीय चौकशी समितीऐवजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करणे योग्य ठरेल असे मत मांडले. पवारांच्या या मतानंतर विरोधकांच्या या प्रश्नांवरच्या एकमुखी भूमिकेला तडे पडल्याने अनेकांनी पवारांवर टीका केली आहे. अदानी प्रकरणाची चौकशी व्हावी, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही व्यक्त केले होत. या प्रकरणात जेपीसी चौकशी का महत्त्वाची आहे यावर त्यांनी भाष्य केलं आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे कष्टाचे हजारो कोटी रुपये कुठे गेले, याचा शोध घेण्यासाठी अदानी उद्योगसमूहाची नि:पक्षपातीपणे चौकशी झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले. पवारांच्या या भूमिकेला काँग्रेसने विरोध दर्शवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी आपण आपले मत मांडलं असल्याचं सांगितलं. तसंच विरोधकांना जेपीसी हवी असेल तर माझी ना नाही असेही म्हटले होतं.
विशेष म्हणजे ‘एनडीटीव्ही’वर सध्या अदानी उद्योगसमूहाचे नियंत्रण आहे. पूर्वी सरकारवर टीका करताना टाटा-बिर्ला समूहांची नावे विरोधकांकडून घेतली जात होती. सध्या मात्र, अदानी-अंबानी समूहांची नावे सरकारला लक्ष्य करताना घेतली जातात. अंबानी समूहाने पेट्रोकेमिकल्स आणि अन्य क्षेत्रांत भरीव काम केले आहे. अदानी समूहाने वीज व अन्य क्षेत्रांत मोठे काम केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट सूचक आहे. या भेटीत या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. मात्र या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असून आता या भेटीवरून विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. शरद पवार आणि गौतम अदानी हे एकमेकांना भेटले तेव्हा त्या ठिकाणी कुणीही इतर उपस्थित नव्हते. गौतम अदानी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही, असं स्पष्ट आणि परखड मत पवारांनी व्यक्त केले होते. तसेच त्यासाठी त्यांनी कारणही दिले आहे. एवढेच नाही तर देशात इतर प्रश्नही अदानी यांच्या प्रकरणापेक्षा महत्त्वाचे आहेत. हिंडेनबर्ग हे नावही मी कधीच ऐकलेलं नाही. त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असेही शरद पवार यांनी म्हटले होते. तसेच संयुक्त संसदीय समितीच्या विरोधातच त्यांनी भूमिका घेतली आहे.