बजरंग दलाकडून दांडियाचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न
बजरंग दल या हिंदुत्त्ववादी संघटनेने दांडियाचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना बारामतीत (दि. ५) घडली. बारामती चिराग गार्डन येथे नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उधळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत अशा संघटनांची मॉरल पोलिसिंग खपवून घेणार नसल्याचाही इशारा दिला.
बारामतीत अशा पद्धतीने गुंडगिरी कधीच झाली नाही. हे मोरल पोलिसिंग यापुर्वीही आम्ही खपवून घेतले नव्हते आणि यापुढेही घेणार नाही. अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्यांवर पोलिसांनी कायद्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केल्यानंतर पोलीस प्रशासनाने नवरात्रोत्सवात दांडिया आणि गरबा खेळण्याच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नवरात्रीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी पोलीस ठाणे, गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पायी गस्त घालण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्याच्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त तैनात करावा. विशेषतः आपापल्या हद्दीतील उद्याने, मोकळी मैदाने, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांवरील गस्त वाढवावी. गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाही याचीही दक्षता घ्यावी, अशी सूचना पोलीस प्रशासनाने केली आहे.