मनोिमलनाची चर्चा असतानाच धनंजय मुंडेंची बहिणींवर टीका
#बीड
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तसेच खासदार प्रीतम मुंडे या भाऊ-बहिणींच्या नात्यात नव्याने जवळीक निर्माण होऊन दुरावा संपत असल्याची चर्चा असतानाच धनंजय मुंडे यांनी दोन्ही बहिणींवर जोरदार टीका केली.
परळीचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत ब्रह्मवाडी येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन केले. यावेळी आपल्या दोन्ही बहिणींवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही मतदारसंघातील एक साधा बायपास रोड झाला नाही. मात्र परळीकरांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो आणि बायपास रोड पूर्ण होताच इथल्या जमिनीचा भाव वाढला. आता इथल्या जमिनीचे भाव ३० लाखाहून एकराला तीन कोटींवर गेले आहेत. एवढी प्रगती कधी पाहिली होती का?’’
काही दिवसांपूर्वी झालेल्या संत भगवानबाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन झालेले दिसले होते. बहीण भावातील संघर्षाची दरी कमी झाल्याचे व्यासपीठावरून दोघांनी केलेल्या भाषणातून जाणवत होते. मुंडे भाऊ-बहिणींतील राजकीय कटुता कमी होत असल्याची चर्चा सुरू असतानाच पंकजा यांच्या ताब्यात असणाऱ्या जवाहर एज्युकेशन सोसायटीवर धनंजय मुंडे यांची आश्रयदाता सभासद म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या संस्थेवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची एक हाती सत्ता होती. नंतर पंकजा यांनी त्यावर वर्चस्व निर्माण केले. मात्र या संस्थेवरून भाऊ-बहिणींत अनेकदा संघर्ष झाला. जवाहर एज्युकेशन सोसायटीत झालेल्या अनियमिततेवरून धनंजय मुंडे हे न्यायालयातदेखील गेले होते.
‘‘मी आमदार असेपर्यंत मतदारसंघातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, असा माझा प्रयत्न आहे. ब्रह्मवाडी शिवारातील जमिनींचे पाच वर्षांपूर्वीचे भाव आणि आताचे भाव यात फरक पडला की नाही? या भागातल्या जमिनींचा भाव प्रतिएकर आता तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. तुमच्या तीस लाखांच्या जमिनी तीन कोटी रुपयांच्या झाल्या आहेत. लोकांना रस्ता, वीज, घरकुल, पाणीपुरवठा, साफसफाई करणे किंवा एखादं घरकुल, सभागृह दिलं म्हणजे विकास केला असे म्हणता येत नाही. प्रत्येक नागरिकाचे जीवनमान सुधारले पाहिजे, त्याचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, तरच खरा विकास झाला असे म्हणता येईल,’’ असे धनंजय मुंडे यांनी नमूद करत त्यांनी केलेल्या कामांचा दाखला दिला.
वृत्तसंस्था