Thackeray brothers : कातळशिल्पाबाबत ठाकरे बंधूंचे एकमत

गेल्या अनेक वर्षांपासून परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन भावांनी बारसू परिसरातील कातळशिल्पांच्या जतनासाठी आक्रमक भूमिका घेत रिफायनरी प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 8 May 2023
  • 01:59 am
कातळशिल्पाबाबत ठाकरे बंधूंचे एकमत

कातळशिल्पाबाबत ठाकरे बंधूंचे एकमत

बारसू रिफायनरी प्रकल्पास उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा विरोध, दोघांनीही िदली ‘कोकण बचाव’ची हाक

#महाड

गेल्या अनेक वर्षांपासून परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन भावांनी बारसू परिसरातील कातळशिल्पांच्या जतनासाठी आक्रमक भूमिका घेत रिफायनरी प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवला.

                         

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बारसूत जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. ‘‘जागतिक वारसा असलेली अनेक कातळशिल्पे बारसूत आहेत. त्यांच्या संवर्धनाचा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पापासून ही जागा १०० मीटरवरच आहे. नियमानुसार इथे कुठलेही विकासकाम करता येत नाही, पण रिफायनरीसाठी मातीची चाचणी केली जात आहे. असे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील,’’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनीही कातळशिल्पांच्या ३ किलोमीटर भागात प्रकल्प होऊच शकत नाही, अशी ठाम भूमिका घेतली. ‘‘जागतिक वारसास्थळ असलेल्या अशा ठिकाणापासून सुमारे ३ किलोमीटरवर कोणतेही बांधकाम, प्रकल्प उभारणी करताच येत नाही. त्यामुळे इथे रिफायनरीही होऊ शकत नाही. माझी कोकणवासीयांना विनंती आहे, आपल्या जमिनी कवडीमोल दरात कुणालाही विकू नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रत्नागिरीतील सभेत केले.

कोकणी माणसाला उद‌्ध्वस्त करणारा रिफायनरीचा प्रकल्प मी नाणारमध्ये होऊ दिला नाही. आता बारसूमध्येही होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी महाड येथे आयोजित ‘शिवगर्जना’ मेळाव्यात सरकारला दिला. महाडच्या सभेतही त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेचा समाचार घेतला. गद्दारांनी मलिदा खाऊन उपऱ्यांना इथल्या जमिनी विकल्या. हे गद्दार माझ्याकडे बारसू प्रकल्पासाठी यायचे म्हणून मी तेव्हा पत्र दिले होते, पण जोवर कोकणी बांधव संमती देत नाही तोपर्यंत मी हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे त्यांनी सुनावले.

कोकणामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला पोसण्याची क्षमता असल्याचे नमूद करून राज ठाकरे म्हणाले, ‘‘कोकणात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपदा आहे. केरळसारखे राज्य पर्यटनावर चालते तितकीच इथेही क्षमता आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकटा कोकण पोसू शकतो. मात्र इथे तशी विकासकामे झाली नाहीत. कोकणातील जमिनी कवडीमोल दरात घेऊन नंतर त्या प्रकल्पांसाठी कोट्यवधीत विकायच्या, असा धंदा लोकप्रतिनिधींनी केला. दाभोळ, जैतापूर, नाणार आणि बारसूमध्ये हेच झाले. तिकडे समृद्धी महामार्ग चारच वर्षांत शिर्डीपर्यंत पूर्ण झाला. गोवा-मुंबई महामार्गाचे काम मात्र १६ वर्षांपासून रखडले आहे. तुमचे आमदार-खासदार याबाबत जाब विचारत नाहीत. कारण त्यांनी तुम्हाला गृहीत धरलेय. अशा नेत्यांना आता तरी धडा शिकवा.’’

माझ्यावर टीका केली तरच काहींना भाकरी मिळते : उद्धव ठाकरे

राणे पिता-पुत्रांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘इथे काहीजणांना माझ्यावर रोज टीका केली तरच भाकरी मिळते. विशेष म्हणजे ते एकावर दोन फ्री आहेत. काय करावे त्यांना समजत नाही. डोक्यावरचा टोप सांभाळावा तर दोन्ही पोरं सुटतात अन‌् दोन पोरं सांभाळायची तर डोक्यावरचा टोप जाईल अशी भीती त्यांना वाटते.’’ ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या वेळी खडेबोल सुनावले. ‘‘आमच्या मिंध्यांनी कर्नाटकात जाऊन त्यांची भांडी घासली. आपले मुख्यमंत्री तिकडे कानडीत जाहिरात करत आहेत, तर तेथील मुख्यमंत्री बोम्मई मराठी माणसाविरोधात पुन्हा बरळले आहेत. अनेक वर्षे तिथे भाषिक अत्याचार सुरू आहे. तिथे जाऊन त्यांना जाब विचारण्याची मिंध्यांमध्ये हिंमत आहे का,’’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

‘दादा’गिरीस काका घाबरले असतील : राज ठाकरे

राज्यात अलीकडेच गाजलेल्या शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘‘मला वाटते शरद पवारांना राजीनामा द्यायचाच होता, पण ज्या वेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला तेव्हा अजित पवार कसे बोलत होते? ते पाहूनच कदाचित त्यांनी निर्णय मागे घेतला असेल. हा आताच उर्मट बोलतोय, उद्या आपण राजीनामा दिल्यावर कसा बोलेल, याची चिंता त्यांना पडली असेल,’’ असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest