खारघर कथित उष्माघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन
# मुंबई
खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान झालेल्या उष्माघात घटनेची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावेळी १४ जणांचा मृत्यू झाला. यावरून एकूणच राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम झाला आणि लाखो लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हे समितीचे अध्यक्ष असतील. ही समिती एक महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल.
भविष्यातील अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी-दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल, असं सरकारने निवेदनात म्हटले आहे. रविवारी ( १६ एप्रिल ) झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारींना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील मंत्री उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमाला गालबोट लागले. खारघर मैदानावरील कार्यक्रमाला धर्मधिकारी यांचे अनुयायी कोकण आणि राज्याच्या विविध भागातून दाखल झाले होते. दुपारी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी तापमान ४२ अंश सेल्सियस होते. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी खारघर येथे किमान वीस लाख लोक आले होते. त्यांना कमालीचा उष्मा असलेल्या वातावरणात कोणत्याही योग्य सुविधेशिवाय सात तासांहून अधिक काळ ताटकळत बसावे लागले होते. या उष्म्याचा या भक्तांना कमालीचा त्रास झाला होता. तेथे योग्य पद्धतीने पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. तसेच एवढ्या लोकांच्या खाण्या-पिण्याचीही व्यवस्था नव्हती. हे लोक कार्यक्रमानंतर चेंगराचेंगरीत मरण पावल्याचा व्हीडीओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यातच २५ लाखांचा पुरस्कार आणि कार्यक्रमाचा खर्च १४ कोटी झाल्याने यामागे राजकीय शक्तिप्रदर्शनाचा भाग अधिक असल्याची टीका होत आहे.