उदगीरसाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष
#लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरस सुरू असून भाजपने या जागेवर दावा सांगितला आहे, तर सध्या मंत्री असलेले या मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांना त्यांच्याच पक्षातून विरोध असल्याचेही स्पष्ट झाले आहे. भाजपच्या या मागणीमागे बनसोडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुपे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसमधील इच्छुक कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत प्रत्येक मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू आहे. 'ज्याचा आमदार त्याचा तो मतदारसंघ' असे सूत्र महायुतीत ठरले आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना त्यांचा मतदारसंघ मिळणार आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी दिसत आहे. अगदी मंत्री असलेल्या मतदारसंघातही आता मित्रपक्ष विरोध करत असल्याचे दिसून येत आहे. त्या पैकीच एक मतदारसंघ आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय बनसोडे हे आहेत. शिवाय ते सध्याच्या महायुतीत सरकारमध्ये मंत्रीही आहेत. महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अनेक जागांवर अजूनही पेच निर्माण झालेला आहे. त्यातून वाद आणि बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभेची जागा भाजपला मिळावी अशी मागणी होत आहे. या मतदारसंघातून भाजप उमेदवार विजयी होऊ शकतो असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. त्या पार्श्वभूमीवर विश्वजित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. मुंबईत ते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत. जवळपास ५०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे वरिष्ठांना भेटणार आहेत. बावनकुळे यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस यांचीही ते भेट घेतील. ही जागा भाजपने स्वत:कडे घ्यावी, अशी ते मागणी करणार आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघात नेहमीच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत राहिली आहे. संजय बनसोडे हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी भाजपच्या अनिल कांबळे यांचा पराभव केला होता. त्या आधी सलग दोन वेळा भाजपचे सुधाकर भालेराव हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. भालेराव आता तुतारी हातात घेऊन मैदानात उतरणार आहेत. वृत्तसंंस्था