जितेंद्र आव्हाडांना का वाटते अटकेची भीती ?
मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केले आहे. जितेंद्र आव्हाड यांना नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही, पण केंद्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी नेमके कोणाचे प्रयत्न सुरू आहेत, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. ठाण्यात आगामी काळात महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घडामोडी घडणार आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. “मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो. केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी मला सूचक माहिती दिलीय. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घातलंय की, कुठल्याही परिस्थितीत तुला अटक केली जाईल, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. काही महिने आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलाय, निदान ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तशी माझ्या विरोधात एकही केस नाही, पण ही जेव्हा बातमी येते तेव्हा आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर याआधीही अटकेची कारवाई
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका मॉलमधील मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. संबंधित प्रकरण मिटल्यानंतर लगेच ठाण्यातील विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित प्रकरणी खूप प्रयत्न केल्यानंतर आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे आरोप करण्यात आल्यामुळे ते आतून खचले होते. त्यांनी थेट राजकारण सोडण्याचं वक्तव्य केलं होतं. संबंधित प्रकरणं मिटली असताना आता आव्हाडांनी माध्यमांसमोर येत नवीन दावा केला आहे.