शोषणाच्या प्रश्नावर झाकीरचा संताप

आम्ही मुस्लीम म्हणवून घेतो पण मुलींचे लैंगिक शोषण करतो, त्यांच्या शिक्षणावर बंधने आणतो. हे इस्लामला कसे मान्य होते, या पाकिस्तानी युवतीच्या प्रश्नावर स्वयंघोषित इस्लामिक धर्मगुरू आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी झाकीर नाईक निरुत्तर झाला.

पश्तू युवतीने उपस्थित केलेल्या सवालाने झाला निरुत्तर, इस्लामबद्दल शंका उपस्थित न करण्याची दमदाटी

इस्लामाबाद : आम्ही मुस्लीम म्हणवून घेतो पण मुलींचे लैंगिक शोषण करतो, त्यांच्या शिक्षणावर बंधने आणतो. हे इस्लामला कसे मान्य होते, या पाकिस्तानी युवतीच्या प्रश्नावर स्वयंघोषित इस्लामिक धर्मगुरू आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी झाकीर नाईक निरुत्तर झाला. त्यानंतर संतापत त्याने संबंधित युवतीला इस्लाम धर्माची बदनामी केल्याचा आरोप ठेवत त्वरित माफी मागण्याची मागणी केली.

झाकीर नाईक हा धार्मिक प्रवचने देण्यासाठी पाकिस्तानला गेला आहे. महिनाभर त्याचा पाकिस्तानमध्येच मुक्काम असणार आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये प्रवचनाच्या कार्यक्रमात एका पश्तू तरुणीने विचारलेल्या प्रश्नावर झाकीर नाईक संतापल्याचे पाहायला मिळाले. तो तिला म्हणाला, तू इस्लामवर गंभीर आरोप करत आहेस, तातडीने माफी माग. या तरुणीने झाकीरला विचारले होते की, मी ज्या भागातून आले आहे, तिथले लोक स्वतःला मुस्लीम म्हणवतात. परंतु, लहान मुलांचे, मुलींचे लैंगिक शोषण करतात, मुलींना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जात नाही. हा इस्लाम आहे का, या प्रश्नावर झाकीर नाईकचा तिळपापड झाला होता.

इस्लाममध्ये हे गैरप्रकार कसे काय चालतात?

ही तरुणी झाकीर नाईकला म्हणाली, मी जिथे राहते, त्या भागात पश्तून भाषा बोलली जाते. मी जिथून आले आहे तिथे आजूबाजूला केवळ मुस्लीम समाज आहे. परंतु, त्या भागात महिला कोणत्याही महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकत नाहीत. तिथे दर जुम्म्याच्या दिवशी (शुक्रवारी) तब्लिगी जमातच्या लोकांची वेगवेगळी फर्माने येतात. अलीकडेच आमच्या येथे मोठा तब्लिगी इज्तिमा झाला.

आमच्या भागातील लोक खूप धार्मिक आहेत. असे असले तरी या भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होते, तरुणांना ड्रग्स घेण्याचे व्यसन लागले आहे, लहान मुलांचे लैंगिक शोषण केले जात आहे. खंडणीचे प्रकारही घडत असतात, भरपूर व्याज आकारत सावकारी कर्जे दिली जातात. आपली समाजव्यवस्था ढासळत चालली आहे.

लहान मुलींचे लैंगिक शोषणा करणाऱ्यांना उलेमा काहीच बोलत नाहीत, त्यांच्यात बदल घडवून आणत नाहीत, असे का घडत आहे. लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना उलेमा समजावत का नाहीत. या गोष्टी इस्लाममध्ये कशा काय चालू शकतात. तरुणीचा हा प्रश्न ऐकून झाकीर नाईक संतापून म्हणाला, तू जो प्रश्न विचारला आहेस त्यात खूप विरोधाभास आहे.

कोणत्याही इस्लामिक परिसरात, इस्लामिक वातावरणात लहान मुलांचे लैंगिक शोषण होऊ शकत नाही. हे बिलकूल शक्य नाही. त्यामुळे तू माफी मागायला हवीस. तुझा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. तू चुकीची आहेस. तुला हे स्वीकारावं लागेल. तू इस्लामवर आरोप करत आहेस. तुला माफी मागावी लागेल, आत्ताच्या आत्ता माफी माग. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest