संग्रहित छायाचित्र
पुणे: तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर झाला. सोबतच हा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एक्सवर एकाच व्यक्तीच्या दोन परीक्षांमधील निकालांची तुलना करून आरोप केले आहेत. या दोन परीक्षांमध्ये फक्त १५ दिवसांचा गॅप होता. वनरक्षक परीक्षेमध्ये मध्ये केवळ ५४ गुण घेणाऱ्याने तलाठी परीक्षेमध्ये २०० पैकी २१४ गुण घेऊन टॉप केलं आहे. (Talathi Exam)
"यावरून समजून जावे की, पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. ९९ टक्के जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे," असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.
महसूल व वन विभागामध्ये ४७९३ जागांसाठी तलाठी भरतीची परीक्षा ७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती.
तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली. फडणवीस यांनी रविवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.