Ajit Dada : अजितदादा, मुख्यमंत्रिपद अन् चर्चेचा धुरळा!

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यातच अजितदादा भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर राज्याच्या विविध भागात लागत आहेत. गुरुवारीही अशाच चर्चेचा धुरळा उडाला. अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या अमोल मिटकरी यांनी अजित पवार हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार… वेट अँड वॉच… असे विधान केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 28 Apr 2023
  • 05:26 pm
अजितदादा, मुख्यमंत्रिपद अन् चर्चेचा धुरळा!

अजितदादा, मुख्यमंत्रिपद अन् चर्चेचा धुरळा!

अमोल मिटकरी म्हणतात दादा मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हे म्हणतात, जयंत पाटील भावी मुख्यमंत्री

#मुंबई 

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यातच अजितदादा भावी मुख्यमंत्री अशी पोस्टर राज्याच्या विविध भागात लागत आहेत. गुरुवारीही अशाच चर्चेचा धुरळा उडाला. अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या अमोल मिटकरी यांनी अजित पवार हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार… वेट अँड वॉच… असे विधान केले.  दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असल्याचे प्रतिपादन केले. त्यातच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असलेले अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्रीच काय, त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असे मला वाटत असल्याचे विधान केले.

बीडमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार… थोडे थांबा आणि पाहा. महाराष्ट्राचे राजकारण सांभाळेल, असा राज्यात अजितदादांसारखा दुसरा नेता नाही, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: कबूल केलं आहे. त्यांच्या राजकीय उंचीएवढा नेता राज्यात नसल्याने अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच आहेत.

मिटकरी पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सक्तीच्या रजेवर गेले आहेत, त्याचा याच्याशी संबंध जोडू नका. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि अजित पवार मुख्यमंत्रिपदावर दिसतील. मिटकरी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबद्दल इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यात गेले काही दिवस राजकीय चर्चेचा धुरळा उडत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या विधानामुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या विधानानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमोल कोल्हे बुधवारी सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नाही, असे ते म्हणाले. मिटकरी आणि कोल्हे यांच्या परस्परविरोधी विधानानंतर मुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत दोन गट आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बारामती, पुणे, धाराशिव, नागपूर आणि उल्हासनगर येथे बॅनर झळकले आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे, तर काही ठिकाणी मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवार ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या बातम्याही प्रसारमाध्यमांतून समोर येत होत्या. या सर्व घटनाक्रमानंतर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार, असेही अजित पवार म्हणाले होते.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story