मुख्यमंत्री अचानक सुटीवर
#मुंबई
सर्वोच्च न्यायालयात दाखल १६ आमदारांच्या अपात्रतेवरील प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याचे संकेत मिळाल्यावर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याप्रमाणे ते कोणतीही कल्पना न देता नाॅट रिचेबल झाले नसले तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अचानक तीन दिवस सुटी घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री सुटीवर का गेले, यावरून राज्याच्या सत्तावर्तुळात उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांनी या सुटीची अधिकृत माहिती दिलेली नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री असे सुटीवर जाण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.
मुख्यमंत्री २४ ते २६ तारखेदरम्यान सुटीवर असल्याचे समजते. त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नंतर ‘‘सातारा जिल्ह्यात आपल्या गावी जात आहे,’’ असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. मूळ गावी ते देवपूजा करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. एकीकडे अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, त्यांनी मुख्यमंत्री होण्याची बोलून दाखवलेली उघड इच्छा, सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येण्याची शक्यता, या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री अधिकृत माहिती न देता थेट तीन दिवस सुटीवर गेल्यामुळे साहजिकच चर्चेला तोंड फुटले आहे.
सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी एकनाथ शिंदे गावातल्या देवीला साकडे घालणार असल्याचे समजते. शिवाय राजकीय कोलाहलातून थोडी विश्रांती हासुद्धा त्यामागचा हेतू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला, तर भाजप अजित पवारांना सोबत घेणार असल्याची चर्चा जोरात आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे समजते. ते त्यांना उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी भाजपवर दबाव टाकण्यासाठी हा मार्ग अवलंबल्याचे समजते. वृत्तसंस्था