छगन भुजबळ हा डुप्लिकेट नेता; सगळ्या मतदारसंघात भाजपला आस्मान दाखवणार,
#जालना : मराठ्यांबाबत सरकारचे डोळे गेले आहेत. आता ओबीसी नेते कुठे झोपले आहेत. येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला आहे? आता या जातींना विरोध का नाही?, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांना काहीच कळत नाही. सगळ्या विधानसभा मतदारसंघात आम्ही भाजपचा धुव्वा उडवणार आहोत, असेही जरांगे म्हणाले. (Manoj Jarange)
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मराठे आता शहाणे होतील. मराठ्यांचे डोळे उघडणे गरजेचे होते. सरकारने या जातींना ओबीसीत घेताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतले आहे का? हे एकमेकांना लिफ्ट देत आहेत. मराठ्यांना आरक्षण देताना यांना त्रास होतो. एवढा जातीयवाद कशासाठी, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की, त्याला काय कळतं हेंद्रा आहे तो. त्याने मराठ्यांचा खेळ संपवला आहे. काय नेरेटिव्ह त्याने सेट केला? आमच्या लोकांना पंधराशे रुपये देतो आणि ओबीसींना आयुष्यभराचे आरक्षण देणार हे योग्य नाही. अशाच समस्या सुटल्याच नाहीत तर आम्ही सण-उत्सव कसे साजरे करणार? फडणवीस यांनी मराठ्यांवर काही उपकार केले आहेत का? उघड्या डोळ्यांनी तुम्ही मराठ्यांचा घात केला. जातवान मराठे तुमचा भुगा करणार, अशा शब्दांत जरांगे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील १५ जातींची ओबीसींच्या यादीत समावेश झाला आहे. ५ जातींच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल १० लाख इतकी आहे. यावर मनोज जरांगेंनी भाष्य केले आहे. मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे पांचट मोचक आहेत. यांनीच या जाती ओबीसीत घेतल्या आहेत. ओबीसीत घेतलेल्या जाती गिरीश महाजन यांच्या जातीच्या उपजाती आहेत. सगळीकडे मराठ्यांचे मतदान आहे. प्रत्येक मतदारसंघात एकेक लाख मतदान आहे. यांना आधी हिंदुत्व म्हणण्याची सवय आहे. आता हिंदू संघटनांसमोर पेच आहे की हे आहे कुणाचे? हरियाणा आणि महाराष्ट्राचं गणित जुळणार नाही. आचारसंहिता लागण्याआधी मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्ही फक्त आचारसंहिता लावा मग तुम्हाला कचका दाखवतो. तुमचे सगळे पाडतो. इथे नेता कार्यकर्ता समाज संपत नाही. तुमचे सगळे पाडतो, असे म्हणत जरांगेंनी आगामी निवडणुकीवर भाष्य केले आहे. वृत्तसंंस्था