चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा मराठवाड्यात विस्ताराचा प्रयत्न

शेतीच्या प्रश्नांवर हक्काची मतपेढी तयार करण्याचे मनसुबे घेऊन तेलंगणाबाहेर हात पाय पसरू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती पक्षाने आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ‘ बीआरएस’च्या जाहीर सभेचे आमखास मैदानात आयोजन करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 20 Apr 2023
  • 01:19 am
चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा मराठवाड्यात विस्ताराचा प्रयत्न

चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा मराठवाड्यात विस्ताराचा प्रयत्न

सगळ्या पक्षांतून नाकारलेले नेतेच गळाला; २४ एप्रिल रोजी चंद्रशेखर राव यांची सभा

#छत्रपती संभाजीनगर

शेतीच्या प्रश्नांवर हक्काची मतपेढी तयार करण्याचे मनसुबे घेऊन तेलंगणाबाहेर हात पाय पसरू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती पक्षाने आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर  येथे ‘ बीआरएस’च्या  जाहीर सभेचे आमखास मैदानात आयोजन करण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाने बीआरएसच्या वाट्याला ताज्या दमाच्या, नव्या राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा सगळ्या पक्षातून नाकारण्यात आलेले, निवडून येण्याची क्षमता नसलेले थोडक्यात निवडणुकीसाठी आवश्यक उपद्रवमूल्य नसलेले कार्यकर्तेच आले आहेत.  

मराठवाड्यात आपापल्या मतदारसंघात प्रभाव नसलेले, निवडणुकीत तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाची मते मिळवणारे नेते, सगळ्या राजकीय पक्षात जाऊन काहीच पदरात न पडलेले नेते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत.  लोकसभा निवडणुकीत जातीय ध्रुवीकरण करत ट्रॅक्टर चिन्हासह आपला प्रभाव निर्माण करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षे काम करणारे कदीर मौलना तसेच गंगापूर मतदारसंघातील अण्णासाहेब माने यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. उदगीर मतदारसंघातून एकाच आमदार झालेले आणि पुन्हा कधीच विजय मिळवता न आलेले मनोहर पटवारी यांनीही बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. या नेत्यांना बरोबर घेत सभेचे आयोजन करण्यात  येणार आहे. या सभेस चंद्रशेखर राव मार्गदर्शन करणार आहेत. सीमावर्ती भागातील काही नेते भारत राष्ट्र समितीच्या हाती लागतील असे मानले जात होते. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे शंकर अण्णा धोंडगे, वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणारे यशपाल भिंगे यांच्यासह शेतकरी संघटनेतील नेत्यांना या पक्षाचे वेध लागले. त्यांनी ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश घेतला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक लढविण्यास इच्छुक पण यश न मिळालेल्या नेत्यांची संख्या मोठी आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना असा प्रवास पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न करून पाहिले. मात्र, ठाकरे गटाचा काही प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी नव्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. रायभान जाधव आघाडी करून स्वत:चे राजकीय अस्तित्व जपत व पक्षीय बळ मिळविणारे हर्षवर्धन जाधव हे नेहमी चर्चेत असतात. कदीर मौलना हे राष्ट्रवादीमध्ये नाराज होते. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावरील नाराज गटाचे ते नेतृत्व करत होते. गंगापूर मतदारसंघात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी बांधणी करण्यास सुरुवात केल्यानंतर अण्णासाहेब माने यांनाही पक्ष बदलण्याची गरज भासू लागली होती. त्यांनीही चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश केला.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest