राज्यातील सर्वाधिक वाघ चंद्रपुरात
#चंद्रपूर
राज्यातील सर्वाधिक वाघांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असून, जिल्ह्यात सुमारे २०८ वाघ आहेत. तर एकूणच विदर्भ लँडस्केपमध्ये ४४६ वाघांची नोंद आहे. मागील व्याघ्रसंख्येच्या तुलनेत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने विदर्भ लँडस्केपचा अहवाल नुकताच प्रकाशित केला. त्यातून ही माहिती समोर आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नऊ एप्रिलला व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. लँडस्केपनुसार व्याघ्रगणनेचा अहवाल एकापाठोपाठ एक प्रकाशित करण्यात येत आहे. त्यात नुकताच विदर्भ लँडस्केपचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार विदर्भ लँडस्केपमध्ये ४४६, तर चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे २०८ वाघांची नोंद आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा वाघांसाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास आहे. तसेच वाघांना मुबलक प्रमाणात येथे शिकार उपलब्ध आहे. त्यामुळे एकट्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या सर्वाधिक असून, त्यापाठोपाठ ब्रम्हपूरी वनक्षेत्रात संख्या आहे.
वनक्षेत्राच्या तुलनेत वाघांची संख्या अधिक असल्यामुळे व्याघ्रप्रकल्पातून वाघ बाहेर पडत आहेत. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. अधिवास आणि अस्तित्वासाठी दोन वाघ आपसात लढत आहेत. त्यामुळे व्याघ्रप्रकल्पाबाहेरील वाघांच्या स्थलांतरणाची सरकारी योजना आहे. मानव-वन्यजीव संघर्ष व वाघाच्या झुंजीत वाढ, वाघाच्या संख्येत झालेली वाढ, अपुरे अधिवास क्षेत्र यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष व दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून वाघाच्या मृत्यूचे प्रमाण कमी करावयाचे असले तर, वाघाचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे, असे जाणकार सांगतात.
वृत्तसंस्था