संग्रहित छायाचित्र
मुंबई: महायुतीची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली असली तरी विरोधक आणि सत्ताधारी पक्षात त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी योजनेला स्वार्थी म्हणणे हा अडीच कोटी महिलांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यावर राज्य सरकारकडून महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना लाडकी बहीण योजनेवरून टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल, असे म्हणत राज ठाकरेंनी महायुतीवर अप्रत्यक्ष टीका केली.
सुनील तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे काय बोलले, याबाबत मला काही माहिती नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वार्थी आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान आहे, असं मी मानतो. आता राज ठाकरे नेमके कोणत्या हेतूने बोललेत हे मला माहिती नाही. तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून मी बोलत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांचे जर ते वाक्य असेल तर ते योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना तटकरे म्हणाले, एखाद्या योजनेबाबत बोलत असताना महिलांना लालूच दाखवली अशा प्रकारचा शब्दप्रयोग करणं म्हणजे त्या महिला असतानाही महिलांचा अपमान करत असल्याचे त्या विसरत आहेत.
मला वाटतं की, प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्यावर आत्मपरीक्षण करावं आणि योग्य भूमिका घ्यावी. तुमचा राजकीय विरोध मी समजू शकतो. महायुतीच्या सरकारला किंवा नेतृत्वाला तुम्ही दोष द्या. मात्र, अशा प्रकारचं वक्तव्य का करता? हे मला काही कळत नाही. ज्यांनी निवडणूक लढवली आहे, त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे. महिलांना अशाप्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही.