नवरात्रौत्सवानिमित्त तुळजापुरात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावी परत जाताना तरुण भाविकांच्या मोटारीला अपघात होऊन त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिघेजण जखमी झाले. सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर सांगोला तालुक्यातील चिंचोली बाह्यवळणावर पहाटे हा अपघात झाला. यातील मृत व जखमी सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. विशेष म्हणजे पुणे - पंढरपूर मार्गावरील कारुंडे (ता. माळशिरस) येथे पुलावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात होऊन चार जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. पाठोपाठच्या अपघाताने प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातात सुखदेव बामणे (वय ४०) आणि नैनेश कोरे (वय ३१, दोघे रा. नांदणी, जि. कोल्हापूर) हे दोघे मृत्युमुखी पडले. जखमींमध्ये सूरज विभूते (रा. कुठली, जि. कोल्हापूर), शिवानंद कोरे (वय ३५, रा. वडगाव, जि. कोल्हापूर) आणि सुधीर चौगुले (वय ३५, रा. नांदणी) यांचा समावेश आहे. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सुखदेव बामणे आणि नैनेश कोरे हे दोघे युवक मोटारीतून बाहेर फेकले गेले. अपघातानंतर रस्त्यावर हाडामासांचा सडा पडला होता.
हे सर्वजण नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून रविवारी रात्री कोल्हापूरहून तुळजापूरला तुळजामातेच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन कोल्हापूरकडे परत जात असताना त्यांची भरधाव मोटार (एमएच ०९ एफबी ३९०८) २६ चाकी मालमोटारीवर (एम पी २० झेडएम ९५१८) पाठीमागून जोरात आदळली. ही मालमोटार सांगोल्यातून डाळिंब भरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. अपघाताची माहिती कळताच सांगोला पोलिसांनी चिंचोली बाह्य वळणावर अपघातस्थळी धाव घेतली.