भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ सुरू
#मुंबई
महाराष्ट्रात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ सुरू असल्याचा दावा काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (दि. १८) केला. इतर पक्षांतील आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यासाठी भाजप मोठमोठे आमिष देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे नेमके काय, हे उलगडून सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘काही आमदारांनी राजीनामा द्यायचा. राजीनामा देण्यास कुणाचे काही बंधन नाही. त्यामुळे सभागृहातील सदस्यांची संख्या कमी होते. मग साहजिकच बहुमताचा आकडाही कमी होणार आहे. त्यानंतर समीकरण बदलू शकतात. महाराष्ट्रात कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या प्रयोगाची शक्यता आहे. ज्यांना आपल्या पुन्हा निवडून येण्याची खात्री आहे, तेच आमदार राजीनामा देतील.’’
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधून ४० आमदारांचा गट बाहेर पडून भाजपत जाणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली. ‘‘चर्चा म्हणून आपण असे गृहीत धरू. पण, हे लोक भाजपमध्ये जाणार आहेत का? ते जर कोणत्या पक्षात गेले नाहीत, तर पक्षांतरबंदी कायद्याची तलवार त्यांच्यावर लटकत राहणार आहे. मोदींच्या डुबत्या नावेत हे आमदार जाणार का? त्यापेक्षा ‘ऑपरेशन लोटस’ची जास्त शक्यता मला वाटते,’’ असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे ४० आमदार भाजपला परवडणारे नसल्याचे गणित चव्हाण यांनी मांडले. ते म्हणाले, ‘‘इतक्या मोठ्या संख्येने भाजप आमदारांना प्रवेश देणार नाही. भाजपवर आधीच मोठे आरोप होत आहेत, असे असताना पुन्हा नव्याने आरोप असलेले नेते पक्षात घेतल्याने भाजपची अडचण होईल. निवडणुकीचे तिकीट कोणाला द्यायचे, हा त्यांच्यासमोर अवघड प्रश्न निर्माण होईल. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार भाजप सोडून काँग्रेसमध्ये येत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डुबत्या बोटीत आमदार जातील असे वाटत नाही. नेत्यांच्या कुटुंबावर, खुद्द नेत्यावर दबाव टाकला जात आहे. राष्ट्रवादीचे एक नेते अजूनही कारागृहात आहेत, तर एक आताच सुटून बाहेर आले आहेत. दबाव तर प्रचंड आहे, चुकीचे घडले असेल तर लोकांवर दबाव टाकला जाऊ शकतो. मग एखादा गट असा निर्णय घेणार नाही. मोठ्या नेत्यालाच त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल.’’
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे १६ आमदार जर अपात्र ठरले तर बहुमताचा आकडा हा १३६ वर येईल. तसे झाले तर शिंदे गट आणि भाजपकडे १४९ आमदार राहतात, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुंबईकडे निघाले आहेत, त्यामुळे या पक्षात अंतर्गत काय सुरू आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जे होईल त्याला सामोरे जाण्यास महाविकास आघाडी आणि काँग्रेस म्हणून आम्ही तयार आहोत, असेही चव्हाण यांनी ठामपणे सांगितले.
वृत्तसंस्था