‘लाडक्या’ बहिणींना तिसरा हप्ता, योजनेसाठी 46 हजार कोटींची तरतूद!

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून एकूण 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

mukhyamantri ladki bahin yojana

संग्रहित छायाचित्र

मुंबई – “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. योजना सुरू झाल्यापासून तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून एकूण 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. योजनेच्या घोषणेपासून विरोधक जोरदार टीका करत आहेत मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही योजना पूर्ण क्षमतेने राबवण्याचा निर्धार सरकारने केला असल्याचे दिसते. 29 सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

प्रति महिना दीड हजार रुपये देणारी योजना –

21 ते 65 या वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमहा दीड हजार रुपये देण्याची ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात घोषित केली. या योजनेला राज्यातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने केला आहे.

प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला 31 जुलै ही तारीख या योजनेत नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख म्हणून देण्यात आली होती. मात्र महिलांचा उदंड प्रतिसाद पाहून 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. तरीही महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून या योजनेसाठी नोंदणी सुरूच ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

योजनेवर विरोधकांची टीका –

अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. तेंव्हापासून योजनेवर विरोधी पक्षाकडून टीका करण्यात आली. “पैसे जमा होताच काढून घ्या, या सरकारचा काही भरवसा नाही”, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. तसेच विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानेही योजनेवर टीका केली.

योजनेत अनेक जणांनी केले गैरव्यवहार –

बोगस आधार कार्ड, बोगस रेशन कार्ड यांचा वापर करून काही जणांनी या योजनेचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेऊन या घुसखोरांना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला आणि पात्र लाभार्थीनाच या योजनेचा लाभ होईल याची दक्षता घेतली. तीन महिन्याचे 4500 रुपये खात्यात थेट जमा झाल्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, विरोधकांनी योजनेच्या विरोधात न्यायालयात देखील दाद मागितली. मात्र न्यायालयाने या योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावल्या. आजही या योजनेसाठी नोंदणी सुरू असून महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद या योजनेला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही, असे अनेकदा सांगितले आहे.

46 हजार कोटी रुपयांची तरतूद –

महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पात 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दरमहा दीड हजार रुपये मिळालेल्या अनेक महिलांनी या योजनेचा सुयोग्य उपयोग केल्याची उदाहरणे महाराष्ट्रात आहेत. एका महिलेने या योजनेतून मिळालेल्या पैशातून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यातून चांगला आर्थिक नफा मिळविला. त्या महिलेची यशोगाथा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती.

कुटुंबाचे आरोग्य, मुलींच्या शिक्षणाची तरतूद, कुटुंबातील आर्थिक आणीबाणी, एसआयपी अशा अनेक कारणांसाठी महिला या योजनेतील पैशाचा विनियोग करीत असल्याचे दिसून येत आहे. गरजवंत महिलांना मासिक खर्चाची हात मिळवणी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest