संग्रहित छायाचित्र
मुंबई: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा सुरू केलेले उपोषण दोन दिवसांपूर्वी स्थगित केले. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील दसऱ्याला भव्य मेळावा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून याची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरवर्षी दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर येथे विजयादशमी मेळावा होतो. त्याचबरोबर गोपीनाथगडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा होत असतो. त्याचबरोबर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्क दसरा मेळावा घेतात. शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदेही मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेऊन संबोधित करतात. आता राज्यात पाचवा मेळावा होणार आहे. मनोज जरांगे पाटीलही दसरा मेळावा घेणार आहेत.
बीडमधील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांचा दरवर्षी दुपारच्या सुमारास दसरा मेळावा होतो, त्यात आता मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा नारायणगड येथे होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात गड आणि गडांभोवती फिरणारे राजकारण, त्यातून तयार झालेले सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय सूत्र, यामुळे गडावरच्या मेळाव्यांकडे सर्वांचच लागून असते, असे म्हटले जाते. हा दसरा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे? याबाबतचे नियोजन करण्यासाठी श्रीक्षेत्र नारायणगड येथे बैठक होणार आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी बीडमधील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण ठरणार असल्याची माहिती मिळत आहे. आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीला सक्षम पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी स्थापन केली आहे. तिसऱ्या आघाडीतील नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेटही घेतली.