पडद्यामागचे ‘उद्योग’ जोरात
#मुंबई
सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन गुरुवारी (दि. २०) भेट घेतल्यामुळे चर्चा रंगली असतानाच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही शुक्रवारी (दि. २१) पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या सलगच्या दोन भेटींमुळे राजकीय तज्ज्ञांसह सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
अदानी यांच्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे-भाजप सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले उद्योगमंत्री सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात पडद्याआडून काहीतरी गंभीर घडत असल्याच्या शंकांना बळकटी मिळाली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याचे संकेत आहेत. अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर विरोधकांनी गंभीर आरोप केल्यानंतर शरद पवारांनी मात्र मोदी-अदानींच्या बाजूने मत मांडले होते. या मुद्द्यांसह सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पडद्यामागून निर्णायक हालचाली तर सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी त्यांची अदानींसोबत तब्बल दोन तास चर्चा झाली. साहजिकच, या चर्चेचा तपशील समोर आलेला नाही. मात्र, हिंडेनबर्ग अहवाल, राहुल गांधी यांनी अदानी-पंतप्रधान मोदी संबंधांवर केलेले आरोप, अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशीची मागणी या विषयांवर सदर भेटीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, घाटकोपर येथे शुक्रवारी (दि. २१) राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता शिबिर झाले. याला शरद पवार उपस्थित होते. मात्र, या शिबिरासाठी अजित पवार यांना निमंत्रण नव्हते, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते असूनही या शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेवरही त्यांचे नाव नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याची धाकधूक या पक्षाचे कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीमध्ये अद्यापही आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबईत एक बैठक बोलावली आहे. या साऱ्या घडामोडी लक्षात घेता शरद पवार-उदय सामंत भेटीत काय चर्चा झाली असेल, याबाबत उत्सुकता आहे.
वृत्तसंस्था