संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री (दि. १२ ऑक्टोबर) गोळीबार झाला. झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर त्यांना तातडीने लिलावाती रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र पोटात आणि छातीत गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. मुंबईसह महाराष्ट्र या घटनेने हादरला आहे. बाबा सिद्दीकी यांना नुकतीच ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा मिळाली होती, परंतु तरीही त्यांची हत्या झाली.
या घटनेनंतर राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्यातील विविध नेत्यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. पाहा कोण काय म्हणाले.
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार:
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार:
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
खासदार सुप्रिया सुळे:
अतिशय धक्कादायक!मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी.
राहुल गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं वृत्त धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबसह आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हेच दिसून येतं आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दीकींना न्याय मिळाला पाहिजे.
विजय वडेट्टीवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते
राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. बाबा सिद्दिकी यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. काँग्रेस पक्षात असताना सहकारी म्हणून आम्ही पक्षासाठी सोबत काम केले आहे. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला बळ हीच प्रार्थना. राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे असं आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहे. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे. गुन्हेगारांना सरकार वाचवते, एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो ही गंभीर बाब आहे याची चौकशी झाली पाहिजे.
खासदार सुनेत्रा पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या धक्कादायक, दुर्दैवी व निषेधार्ह आहे. अल्पसंख्याक बांधवांचे नेतृत्व करणारे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आज हरपले. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते. या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन मी पोलिस प्रशासनाला करते. सिद्दीकी कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. बाबा सिद्दीकी यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली..!
नाना पटोले, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू होणं ही अतिशय धक्कादायक घटना आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना लढण्याची ताकद मिळो, हीच प्रार्थना. बाबा सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री
माझे मित्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या निधनाचे वृत्त समजले. अतिशय दुःखद व धक्कादायक अशी ही बातमी असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! या कठीण प्रसंगी आम्ही सिद्दिकी कुटुंबीयांसोबत आहोत. तसेच या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती सिद्दिकी कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
खासदार अशोक चव्हाण
माझे जवळचे मित्र, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अतिशय धक्कादायक व हादरवून टाकणारे आहे. आम्ही विधीमंडळात एकत्र काम केले. मंत्रिमंडळातही आम्ही सोबत होतो. त्यांचे नेतृत्व लोकांशी नाळ जुळलेले व सर्व समाजात सर्वमान्य असे नेतृत्व होते. बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनाने मी एक चांगला, डॅशिंग मित्र गमावला आहे. त्यांच्या अचानक जाण्याचे मला तीव्र दुःख आहे. अतिशय जड मनाने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे सुपुत्र आ. झिशान सिद्दीकी व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, हीच प्रार्थना.
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
ज्येष्ठ नेते, बाबा सिद्दिकी यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. सत्ताधारी नेते जर महाराष्ट्रात सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल, याचा विचार करा. महाराष्ट्राचा खरच युपी बिहार होतोय का ? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय. बाबा सिद्दिकी यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून ईश्वर त्यांना यातून सावरण्याची शक्ती देवो. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.