संग्रहित छायाचित्र
मुंबई: राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आयुक्तांनी सर्व सरकारी संस्था आणि राज्यातील ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले. सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर करा, तसेच सुट्टीच्या दिवशी मतदान घेऊ नका, एकाच टप्प्यात मतदान घेण्याची विनंती राजकीय पक्षांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करून आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ‘आमचे महाराष्ट्र, आमचे मतदान’ अशी यंदाची टॅगलाईन असेल. यावेळी महाराष्ट्राची मतदार संख्या ९.५९ कोटी असून यात महिला ४.६४ कोटी तर पुरुष मतदारांची संख्या ४.९५ कोटी आहे. पहिल्यांदा मतदान करणारे १९.४८ लाख मतदार आहेत. महाराष्ट्रात १०.१ लाख १ हजार ८६ बूथ आहेत. शहरातील बहुतांशी बूथच्या ठिकाणी सीसीटीव्ही असतील.
शहरी भागातील बूथवर मतदान जास्तीत जास्त होईल यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. मोबाईल आत घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान करायला जाणाऱ्या मतदारांच्या मोबाईलची सोय करावी, अशी मागणीही राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. शहरी भागात मतदान बूथ केंद्रांची संख्या ४२ हजार ५८५, तर ग्रामीण महाराष्ट्रात ५७ हजार ६०१ मतदान बूथ केंद्र असणार आहेत. निवडणूक काळात एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला सायंकाळी ६ ते सकाळी ८ पर्यंत पैसे वाहतूक करता येणारं नाही. या काळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्थांवरही लक्ष ठेवलं जाईल.
ते म्हणाले की, निवडणूक आयोगातर्फे सुविधा पोर्टल नावाने ॲप जारी करण्यात आलं आहे. या ॲपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या मतदान केंद्रावर काही गैरप्रकार घडला किंवा उशिरापर्यंत मतदान सुरू असेल तर केवळ फोटो अपलोड करून तक्रार करता येईल. वृत्तसंंस्था