Ajit Pawar : अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता

अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची क्षमता आहे, मात्र अनेकजण लायकी नसताना तोडफोड करून मुख्यमंत्री होतात, अशा शब्दांत ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 23 Apr 2023
  • 01:12 am
अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता

अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता

संजय राऊत; अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात...

#जळगाव

अजित पवार यांच्यात मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची क्षमता आहे, मात्र अनेकजण लायकी नसताना तोडफोड करून मुख्यमंत्री होतात, अशा शब्दांत ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवारी (दि. २३) उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. यावेळी अजित पवारांनी केलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया देत नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही? मुख्यमंत्री होण्याची क्षमता अजित पवार यांच्यात आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. मात्र अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोडफोड करून. जर एखाद्याच्या भाग्यात योग असतील तर त्यांना ते पदही मिळते. अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाची अनेक वेळा इच्छा बोलून दाखवली. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.’’

संजय राऊत यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनाला उत्तर देताना म्हणाले, ‘‘जळगावात घुसण्याबाबत आम्हाला आव्हान दिले होते, पण आम्ही आलो. आजही जळगाव सेनेचे आहे. उद्धव ठाकरे यांची सभा मोठी होणार असून उद्धव ठाकरे बोलतील काय बोलायचं असेल ते, शिवसेना ही शिवसेना असून कोणी धाडस करून घुसू शकणार नाही.’’

‘‘खोटी कागदपत्रे बनवून धनुष्यबाण तुमच्या हातात दिला असला तरी, मूळ शिवसैनिक आहे, तिथेच आहे. आमदार गेले असतील पण आमदार म्हणजेच शिवसैनिक नाही. आमदार, खासदारावर जर शिवसेना कोणाची आहे, हे निवडणूक आयोगाने ठरवले असेल तर चोवीसमध्ये यांचा पराभव झाल्यानंतर आम्हाला आमची शिवसेना परत देणार का,’’ असा सवालही राऊत यांनी निवडणूक आयोगाला केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest