अजित पवारांना सिन्नरमधून लढण्याची कोकाटेंची ऑफर
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतून लढणार की अन्य मतदारसंघातून लडणार याची चर्चा सुरू असताना अजित पवार यांना सिन्नरमधून निवडणूक लढविण्याची ऑफर आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. शुक्रवारी सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
माणिकराव कोकाटे म्हणाले, अजित पवारांनी विधानसभेची निवडणूक सिन्नरमधून लढवावी. दादा (अजित पवार) माझी तुम्हाला ऑफर आहे. या मतदारसंघातील सर्व जनतेसमोर सांगतो, मला तालुक्याने खूप काही दिलं. आता आमची सर्वांची इच्छा आहे की, या मतदारसंघातील राहिलेले प्रश्न तुमच्या हातामधून सुटावे. त्यासाठी तुम्ही सिन्नरमध्ये येवून मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवा. आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करत आहोत. आम्ही तुम्हाला दीड लाख मतांच्या लीडने निवडून देऊ. एक जरी मत कमी पडले तरी मी मुंबईतील मंत्रालयाची पायरी चढणार नाही.
यावर अजित पवार म्हणाले की, हा माणिकराव कोकाटे यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी मला सिन्नरमधून निवडणूक लढवण्यासाठी विचारलं. आता अनेक ठिकाणी लोक मला विचारत असतात. परवा बारामतीकरांनी माझी गाडीच आडवली. ते म्हणाले की आज तुम्हाला आम्ही जाऊच देणार नाहीत. शेवटी बारामती माझी आहे आणि मी बारामतीचा आहे. तुम्ही माणिकराव कोकाटे यांनाच चांगलं मताधिक्य द्या. फार तर आपण स्पर्धा करू की सिन्नरमधला उमेदवार जास्त मतांनी निवडून येतो की बारामतीचा उमेदवार जास्त मतांनी निवडून येतो.