पाचोऱ्यातील सभेतून ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन
#जळगाव
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच जळगाव दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेद्वारे ठाकरे आपले शक्तिप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहेत. या शक्तिप्रदर्शनातून सामान्य मतदार कोणाच्या पाठीमागे आहे, हे सिद्ध करण्यासाठी ठाकरे गटाने सारा जोर लावला आहे.
पक्षात उभी फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आमदार शिंदे गटात गेले. कधीकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हेही सतत ठाकरे गटावर टीका करत आहेत. आमदारांनी पक्ष सोडला असला तरी सर्वसामान्य शिवसैनिक ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सिद्ध करण्यासाठी शिवसैनिकांनी जोर लावला आहे.
रविवारी उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जळगावमधील पिंप्राळा उपनगरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन होईल. सायंकाळी साडेसहा वाजता पाचोरा येथे जाहीर सभा असून त्यापूर्वी शिवसेनेचे नेते आणि दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचेही अनावरण होणार आहे. आर. ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी सभेचे आयोजन केले आहे.
सध्या तापमानाचा पाराही चढता आहे. ठाकरे गटाच्या सभेने राजकीय वातावरण तापणार आहे. या दौऱ्यामुळे पदाधिकारी, शिवसैनिकांमध्ये उत्साह असून, तीन-चार दिवसांपासून जिल्हाभर बैठकांचा सपाटा सुरू आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेऊन त्यांना थेट आव्हान दिले होते.
याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले, “आर. ओ. पाटील यांचे माझ्यावर फार उपकार होते. त्यांच्या पुतळ्याचं अनावरणासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. आर. ओ. पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पहिल्यापासून संबंध होते. त्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे येत आहेत. पुतळ्याच्या अनावरणासाठी ते येत असतील, तर उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. सभेत संजय राऊतांसारखा माणूस माझ्यावर बोलत असेल, तर मी एसपींना पत्र देणार आहे, त्यांनी चौकटीत राहून बोलावं. अन्यथा सभेत घुसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.