संग्रहित छायाचित्र
एकीकडे महागाईचा भडका उडालेला आहे. त्यातच सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री लावणारी अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 100 आणि 200 रुपयांचे मुद्रांक म्हणजेच स्टॅम्प आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सगळेच व्यवहार 500 रुपयांच्या स्टॅम्पवर करावे लागणार आहे. अगदी किरकोळ गोष्टींसाठी देखील 500 रुपयांचा स्टॅम्प घ्यावा लागणार आहे. शंभर आणि दोनशे रुपयांचे स्टॅम्प पेपर आता इतिहासजमा होणार आहे.
महाराष्ट्र मुद्रांकाच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यपालांनी सोमवारी अध्यादेश काढला होता. त्यानंतर त्याची अंमलबजावणी आज १६ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.
प्रतिज्ञापत्र, भाडे करार, कर्ज प्रकरणं, शैक्षणिक कामांसाठी लागणारं प्रतिज्ञापत्र, विक्री करार ही कामं 100 रुपयांच्या स्टॅम्पवर केली जायची. आता या कामांसाठी 400 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहे. तर हक्क सोड पत्रासाठी 200 रुपयांचा स्टॅम्प लागायचा. त्यासाठी आता 300 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहे.
एकूणच आता 500 रुपयांच्या स्टॅम्पवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. शासनाने एका बाजूला लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला दिड हजार रुपये दिले जात आहे. हे पैसे थेट लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येतात. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरील बोजा वाढला आहे. राज्याच्या तिजोरीला पडलेला हा खड्डा भरून काढण्यासाठी आता सर्वसामान्यांच्या खिशाला त्याहून अधिक मोठा खड्डा पडणार आहे.