संग्रहीत छायाचित्र
पुणे : वकील प्रेयसीच्या जाचाला कंटाळून एका ४५ वर्षीय व्यक्तीने तिच्यासमोरच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधामधून या वकील महिलेने आपल्या प्रियकराला आपल्यासमोरच आत्महत्या करण्यास भाग पाडले. तिने ‘पत्नीला सोडून माझ्याबरोबर रहा. तुझ्या मुलाचे माझ्या मुलीशी लग्न करुन दे आणि ३० लाख रुपयांची परतफेड कर किंवा सुस येथील फ्लॅट नावावर कर’ अशा मागण्या सुरू केल्या होत्या. ही घटना पुणे स्टेशनसमोरील होमलँड लॉजमध्ये ९ जानेवारी २०२५ रोजी घडली.
अंकुश डांगे (वय ४५, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माढा तालुक्यातील ४२ वर्षाच्या महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यावेळी डांगे यांनी आत्महत्या केली तेव्हा आरोपी वकील महिला तेथे उपस्थित होती. या महिला वकिलाचे पती न्यायाधीश असून त्यांना यांच्यातील अनैतिक प्रेमसंबंधांची कल्पना होती, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होता. आरोपी महिला वकिल व डांगे यांची व्यवसायानिमित्त ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपी महिला डांगे यांच्याकडे ‘तू पत्नी व मुलीला सोडून दे आणि माझ्याबरोबर रहा. अन्यथा आत्महत्या कर’ असे म्हणत त्यांना त्रास देत होती. डांगे यांचा मुलगा व आरोपींची मुलगी यांचे लग्न लावून देण्याचा तगादा तिने लावला होता. तसेच, डांगे यांच्या पत्नीच्या नावे असलेले बार अॅ न्ड रेस्टॉरंट व मंगल कार्यालयाचे सुशोभिकरण करण्याकरीता डांगे यांनी आरोपी वकील महिलेकडून ३० लाख रुपये घेतले होते. या पैशांची मागणी तिने सुरू केली होती. पैसे न दिल्यास सुस येथील फ्लॅट नावावर करून देण्यासंदर्भात तिने तगादा लावला होता. त्याकरिता सातत्याने मानसिक त्रास देखील देत होती.
आरोपीने ९ जानेवारी रोजी डांगे यांना होमलँड लॉजमध्ये बोलावून घेतले. त्याच विषयावरुन त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. नाहीतर आत्महत्या कर, असे ती म्हणाली. तिच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी तिच्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.