पुणे : वाघोली येथील एका सोसायटीतील फ्लॅटमधून तब्बल 23 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. कुटूंबासह दिवाळी सणाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील गावी गेले असता घराची चावी शेजाऱ्याकडे दिली असता आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या घरातील कपाटातून 58 तोळे सोन्याचे दागिने चोरी केले. हा प्रकार 28 ऑक्टोबर 2024 ते 19 नोव्हेंबर 2024 या दरम्यान वाघोली येथे घडला.
याप्रकरणी गौरव आदर्श गेरा (वय 37, रोहण अभिलाषा सोसायटी वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावरून निखील गुप्ता (वय 35) आणि तन्नी गुप्ता (वय 32) (रा. फ्लॅट नं. ए-3/104, रोहण अभिनव सोसायटी, वाघोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दिवाळी साजरी करण्यासाठी सहकुटूंब उत्तर प्रदेशातील गावी गेले असता घरातील झाडांना पाणी टाकण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने त्यांना विश्वासात घेऊन फिर्यादी यांच्या कपाटातील 23 लाख रुपये किंमतीचे 58 तोळे सोने चोरी केले. हा प्रकार 28 ऑक्टोबर 2024 ते 19 नोव्हेंबर 2024 वाघोली येथे घडला. दरम्यान, फिर्यादी घरी परत आल्यानंतर त्यांच्या काही दिवसांनी कपाटातील सोने चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून घेतला. पुढील तपास पोलीस करत आहेत.