संग्रहित छायाचित्र
देवदर्शन करण्यासाठी नारायण पेठेमधील मोदी गणपती मंदिरात गेल्यानंतर मागे चोराने एका ज्येष्ठ नागरिकाचे घर फोडले. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून कपाटातील ६ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी दुपारी दुपारी घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधिका अतुल तुंगतकर (वय ४३, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. घरफोडीचा हा प्रकार नारायण पेठेतील आयतोळे बिल्डिंगमध्ये सोमवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई शोभा अशोक शेंडगे (वय ८०) या एकट्याच राहतात. त्यांच्या मैत्रिणीची मुलगी अभ्यास करुन त्यांच्या आईची देखभाल करत असते. गौरी ही अभ्यासिकेत अभ्यासाला गेली होती. शोभा शेंडगे या दुपारी साडेतीन वाजता घराला कडी कोयंडा लावून मोदी गणपती मंदिरात गेल्या होत्या. सायंकाळी सव्वासहा वाजता त्या परत आल्या.
तेव्हा त्यांच्या घराच्या दाराचा कडी कोयंडा तोडला असून दार लोटले असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी घराचे आत जाऊन बघितले असता किचनमधील लोखंडी कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त बाहेर पडलेले असून कपाटाचे दार वाकवून कपाट उघडले असल्याचे दिसून आले. कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचा हार, साखळी, सोन्याचा नेकलेस तसेच ५ हजार रुपये रोख असा ६ लाख २९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड तपास करीत आहेत.