संग्रहित छायाचित्र
महाविद्यालयातील तरुणीबरोबर ओळख वाढवून आईशी भेट करुन देतो, असे सांगत घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या नकळत या शारीरिक संबंधांचे चित्रीकरण करून तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला धमकावत त्याने २ महिने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या वर्गमित्राला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी १८ वर्षीय पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी १९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान आरोपीच्या घरी व लॉजवर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिकतात. आरोपी तरुणाने फिर्यादीला आईची भेट करुन देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन करुन आपल्या घरी आणले. घरी कोणीही नव्हते. तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तिच्या नकळत शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडिओ काढून फिर्यादीला दाखविला.
त्यानंतर मी ज्यावेळी बोलवीन, त्या वेळेस मला भेटायचे व याबद्दल कोणासही काही सांगायचे नाही, असे म्हणून तिला धमकाविले. फिर्यादी कॉलेजला गेले असताना फिर्यादीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कॉलेजमधून आरोपी तिला दुचाकीवरुन लॉजवर घेऊन जात. तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत व नंतर कॉलेजला आणून सोडत असत. कोणालाही काही न सांगण्याची धमकी देत. फिर्यादी खूप घाबरलेली असल्याने तिने हे कोणाला सांगितले नाही. १२ जानेवारी रोजी फिर्यादीने कॉलेजमध्ये आरोपीने सांगितलेले ऐकले नाही म्हणून कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कानाखाली मारुन तिच्या हातातील बॅग फेकून मारली. गेली दोन महिने सुरु असलेल्या हा शारीरीक छळ असह्य झाल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक हसिना शेख तपास करीत आहेत.