जुगाराच्या नादामुळे केली सख्ख्या बहिणीच्या घरी चोरी
जुगार खेळण्याच्या नादात बीड गावातील भावाने पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन सख्या बहिणीच्या घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुगार खेळण्याच्या नादामुळे तरुणाला आपली पाच एकर जमीन विकावी लागली होती. त्यानंतर जुगार खेळून हरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने आणखी जुगार खेळण्यास सुरुवात केली. तिथे पैसे कमी पडू लागले म्हणून चक्क त्याने सख्ख्या बहिणीच्या घरी चोरी केली. बहिणीच्या घरातून साडेबारा तोळे सोने चोरून नेले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर बहिणीसोबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठीही गेला. पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी चोरी करणाऱ्या भावाला अटक केली.
श्रीकांत दशरथ पांगरे (वय २९, रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी रोजी वाल्हेकरवाडी येथील एका सोसायटीमधून भर दिवसा साडेबारा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून केला गेला. यातील फिर्यादी महिला मेडिकल दुकान चालवीत असून त्यांचे पती नोकरीसाठी दिवसभर बाहेर असतात. त्यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून त्यांचा भाऊ राहण्यासाठी आला होता. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. घरात कोणतीही तोडफोड झाली नसल्याने ही चोरी घरातीलच सदस्याने केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी श्रीकांत पांगरे याच्याबद्दल माहिती घेतली.
श्रीकांत याला जुगार खेळण्याची सवय आहे. त्याने गावाकडील पाच एकर शेत जमीन विकून त्यातून मिळालेले पैसे जुगारात हरले. त्यानंतर जुगारात हरलेली रक्कम पुन्हा ऑनलाईन जुगार खेळून लोकांची उधारी देण्यासाठी तो पुण्यामध्ये आला. चिंचवडमध्ये बहिणीच्या घरी राहून तो डिलिव्हरी बॉयचेही काम करत होता. त्याने १३ जानेवारी रोजी घराचा मागील दरवाजा कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने उघडा ठेवला. त्यानंतर दुपारी घरी कोणी नसताना दरवाज्यातून आत येत घरातून त्याने साडेबारा तोळे वजनाचे दागिने चोरले.
आरोपीने बहिणीच्या घरात घरफोडी झाल्याचा बनाव केला होता. मात्र, दरवाजाची कुठेही तोडफोड झाली नव्हती. खिडकीतून हात घालून दाराची आतील कडी उघडली असावी, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. दरम्यान, हा प्रकार घरातील कोणीतरी व्यक्तीने केला असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. फिर्यादी यांच्या भावावर पोलिसांचा संशय होता. त्यामुळे त्याची गुप्तपणे माहिती काढली. त्यात तो जुगारी असल्याचे लक्षात आले. तसेच तो सोने घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली. जुगाराच्या नादामुळे आरोपी गुन्हेगार बनला आहे. समाजात अनेक तरुन सध्या ऑनलाईन जुगाराच्या नादी लागले आहे. तरुणांनी वेळीच थांबायला हवे.
- शैलेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा