Pune Crime : बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; पाच जण अटकेत, १० लाखांच्या नकली नोटा जप्त, सहकारनगर पोलिसांची कारवाई

पुणे: बनावट चलनी नोटांचे एक रॅकेट उघडकीस आणून सहकारनगर पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख ३५ हजारांच्या २०७० नकली नोटा जप्त केल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 16 Jan 2025
  • 05:19 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

पुणे: बनावट चलनी नोटांचे एक रॅकेट उघडकीस आणून सहकारनगर पोलिसांनी  गेल्या तीन महिन्यांत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख ३५ हजारांच्या २०७० नकली नोटा जप्त केल्या आहेत. 

सहकारनगर पोलिसांनी  वेगवेगळ्या वेळी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे.  निलेश हिरानंद विरकर (वय ३३,  व्यवसाय नोकरी,  रा. विष्णु गावडे चाळ,  चिंचवड स्टेशन समोर,  चिंचवड), सैफान कैयुम पटेल (वय २६,  रा. सेक्टर १२,  ई सत्तार पडन बिल्डींग कोपरखेरने नवी मुंबई ), अफजल समसुद्दीन शहा (वय १९,  रा. सेक्टर १२, ई झमझम अपार्टमेंट कोपरखेरने, नवी मुंबई),  शाहीद जक्की कुरेशी (वय २५,  धंदा चिकन सेंटर,  रा. सेक्टर १२ ई झमझम अपार्टमेंट, कोपरखेरने, नवी मुंबई), शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी (वय २२, रा. जन्मत वेल्फेअर सोसायटी, मीना अपार्टमेंट,  नालासोपारा पुर्व, पालघर, ठाणे)  असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या आदेशान्वये सहकारनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि  अंमलदारांचे एक पथक मागील वर्षी ८ ऑक्टोबरला पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. पुणे सातारा रस्त्यावरील प‌द्मावती बसस्टॉपसमोर पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलीक यांना एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे जाणवले. पोलिसांना बघून ती व्यक्ती गडबडीने स्वारगेटच्या दिशेने जावू लागली. पवार आणि मंडलीक यांनी त्याचा पाठलाग केला. आम्हाला बघून गडबडीने निघून का जात आहेस अशी विचारणा त्याच्याकडे केली. त्यावर ती व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देवू लागली. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याचे नाव, पत्ता विचारले. त्यावर त्याने त्याचे नाव  निलेश हिरानंद विरकर असल्याचे सांगितले. त्याचीकडे चौकशी करत असताना विरकर सतत पँटच्या डाव्या खिशात हात घालायचा. तो काहीतरी लपवित असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याचे खिसे तपासले. तेव्हा त्यांना त्याच्या खिशात ५०० रुपयांच्या नोटांचे एक बंडल आढळून आले. त्याबाबत विरकर याच्याकडे विचारणा केली. मात्र तो त्याबद्दल समाधानकारक उत्तर देवू शकला नाही. 

पोलिसांनी विरकरला विश्वासात घेतले आणि त्याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा त्याने त्या नोटा नकली असल्याचे सांगितले. तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या नोटा चालवण्याच्या उद्देशाने त्या जवळ बाळगल्याचे त्याने सांगितले. दरम्यान पोलिसांनी वीरकरच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या २५० नकली नोटा जप्त केल्या. तसेच सहकारनगर पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहीता २०२३ च्या कलम १८० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. 

रिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील व पोलीस अंमलदार करत होते. तपासादरम्यान विरकर याला या नकली नवी मुंबई मधील नोटा कोपरखेरने  येथील शाहीद कुरेशी, सैफान पटेल आणि अफजल शहा यांनी दिल्या असल्याची माहिती त्याने दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून १९ ऑक्टोबरला सैफान कैयुम पटेल आणि अफजल समसुद्दीन शहा यांना तर २२ ऑक्टोबरला शाहीद जक्की कुरेशी याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. 

अटक केलेल्या आरोपी शाहीद कुरेशी याला पोलिसांनी विश्वासात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला या नकली नोटा शाहफहड अंसारी याच्याकडून मिळाल्या असून त्याच्याकडे आणखी  काही नकली नोटा असल्याची त्याने माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून २५ ऑक्टोबरला शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अंसारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून १० लाख ३५ हजार किंमतीच्या ५०० रुपयांच्या  एकुण २०७० नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

शाहफहड अंसारी याच्याकडे पोलिसांनी तपास केला असता या नकली नोटा त्याने दिल्ली तसेच उत्तर प्रदेश मधील गाझीयाबाद  येथून आणल्याचे सांगितले. त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशनचे एक पथक गाझीयाबाद  येथे जावून या  गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहे.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, महेश भगत खंडु शिंदे, योगेश ढोले यांनी केली.

Share this story

Latest