‘मिस इंटरकॉन्टिनेंटल २०२४’ च्या नावाखाली प्रसिद्ध मॉडेलला गंडा
‘मिस इंटरकॉन्टिनेंटल २०२४’ च्या नावाखाली प्रख्यात मॉडेलला गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्पर्धेच्या नावाखाली या मॉडेलकडून तब्बल दहा लाख रुपये उकळण्यात आले. तसेच, तिला वेगवेगळ्या खात्यांवर पैसे पाठवण्यास भाग पाडण्यात आले. या मॉडेलला इजिप्तमध्ये असलेल्या शर्मल शेख शहरात ‘मिस इंटरकॉन्टिनेंटल २०२४’ स्पर्धेसाठी म्हणून चुकीची विमान तिकिटे पाठविण्यात आली. तसेच, तिच्या परतीच्या तिकिटांमध्येदेखील तीन दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होता. तसेच, प्रवासाचे चुकीचे वेळापत्रक पाठवून फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मलिक इसानी (रा. गुजरात), गोविंद कुमार अग्रवाल (रा. हरियाणा), गौरव जेटली (वय हरियाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात २१ वर्षीय मॉडेलने फिर्याद दिली आहे. ही मॉडेल परिवारासह पुण्यात वास्तव्यास असते. अशा प्रकारच्या स्पर्धा आणि फॅशन शो आयोजित करणाऱ्या एजन्सी आणि आयोजकांकडे तिचा संपर्क आहे. या तरुणीला १ ऑक्टोबर २०२४ रोजी मलिक इसानी याने व्हॉट्सॲपवर संपर्क साधून ‘मिस इंडिया इंटरकॉन्टिनेंटल’ स्पर्धेबद्दल माहिती दिली. ही स्पर्धा इजिप्तमध्ये शर्मल शेख शहरात होणार असल्याचे सांगितले. तसेच, या ‘मिस इंटरकॉन्टिनेंटल २०२४’ साठी तिच्या प्रोफाइलची निवड झाल्याचे सांगितले.
या स्पर्धेसाठी १६ लाख रुपये खर्च येणार असल्याचे कळवले. या स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्याने या तरुणीने बँकेमधून दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. दरम्यान, आरोपी मलिक इसानी याने गोविंद अग्रवालची कंपनी बेलेफेले इंडियाच्या ईमेल अकाउंटवरून मेल केला. या मेलमध्ये स्पर्धेमधील संभाव्य सहभागाबद्दल उल्लेख केलेला होता. या स्पर्धेसाठी मलिक याने सांगितल्याप्रमाणे फिर्यादी मॉडेलने त्याच्या खात्यावर २ लाख ८१ हजार रुपये पाठवले. त्यानंतर, अग्रवाल याच्याशी त्याने ओळख करून दिली. त्यानंतर अग्रवालने जेटलीचा मोबाईल क्रमांक देऊन त्याच्यासोबत ओळख करून दिली. तसेच, त्याला काही रक्कम पाठविण्यासाठी सांगितले. त्यानुसार, जेटलीच्या खात्यावर एनईएफटीद्वारे ३ लाख ५० हजार रुपये पाठविले.
यानंतर फिर्यादीला ‘मिस इंडिया क्राउनिंक’चा कार्यक्रम जयपूर येथे होणार असल्याचे सांगितले. ही मॉडेल मित्रासह जयपूर येथे गेली. तेथे अग्रवाल याने या मॉडेलला दारू देऊ केली. तिने दारू पिण्यास नकार दिला. ‘मिस इंडिया क्राउनिंक’च्या कार्यक्रमाचे नाव नंतर बदलून ‘मिस उर्वशी’ असे करून तिची फसवणूक केली. या कार्यक्रमात अग्रवालने इजिप्तमध्ये होणाऱ्या स्पर्धेचे सर्व नियोजन झालेले असून उर्वरित पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार, या मॉडेलने त्याच्या खात्यावर एनईएफटीव्दारे ३ लाख ६९ हजार रुपये पाठविले. वारंवार मागणी करूनही तिला पावती देण्यात आली नाही. तसेच, ‘मिस इंडिया’ झाल्याचे अपॉइन्टमेन्ट लेटर मागणी करूनही देण्यात आले नाही.