संग्रहित छायाचित्र
पुणे : पिस्तुलाची हौस एका अल्पवयीन मुलाला चांगलीच महागात पडली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून देशी बनावटीचे एक बेकायदा पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई धनकवडी येथील के. के. मार्केट येथील परिसरात करण्यात आली.
आरोपीविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट क ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलाकडे बेकायदा पिस्तूल असून तो के. के. मार्केट येथील एका दुचाकी शोरूमजवळ उभा असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल पवार यांना मिळाली होती. हा अल्पवयीन आरोपी बालाजीनगर येथील शोरूमच्या पाठीमागील गल्लीत एका बंद दुकानासमोर कोणाची तरी वाट पाहत उभा असल्याची माहिती पवार यांना मिळाली होती.
त्यांनी वरिष्ठ पालीस निरीक्षक छगन कापसे यांना याबाबत माहिती कळवली. सहायक निरीक्षक सागर पाटील, सहायक फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महश भगत, खंडु शिंदे यांनी सापळा लावला. या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह हाती लागले.