पिंपरी-चिंचवड : शेवटचा दिवस ठरला घात वार पिंपरी-चिंचवड मावळत्या वर्षाला तीन आत्महत्या तर अपघातामध्ये मृत्यू
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
देहू
देहूगावामध्ये राहत्या घरात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ३०) घडली. भरत कुमार सहा (वय ४६, रा. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भरत कुमार सहा यांनी राहत्या घरामध्ये छतास गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना त्वरित खाली उतरवून वायसीएम रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
देहूरोडमध्ये तरुणीची आत्महत्या
देहूरोड
देहूरोड उपनगरामध्ये राहत्या घरात गळफास घेत १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ही घटना विकासनगर येथे सोमवारी (दि. ३०) पहाटे उघडकीस आली.
शांता यशवंत नाटेकर (वय १७, रा. विकासनगर, देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांता हिने राहत्या घरात गळफास घेतला. सोमवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही बाब लक्षात येताच तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
शेलारवाडीत एकाची आत्महत्या
तळेगाव दाभाडे
मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे राहत्या घरात गळफास घेत एकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. ३०) दुपारी उघडकीस आली.
सुधीर मारोती पानसकर (वय ५०, रा. शेलारवाडी, ता. मावळ, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास राहत्या घरातमध्ये छताच्या लाकडाला लाल रंगाच्या कपड्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांना मयत घोषित करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत करीत आहेत.
अपघाताच्या दोन घटना; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
हिंजवडी
हिंजवडी येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडीतील लक्ष्मी चौकात रविवारी (दि. २९ ) रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास घडली.
कुशल प्रभाकर (वय २७, रा. एक्सबिरिया सोसायटी, हिंजवडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशल प्रभाकर हा रविवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून चालला होता. लक्ष्मी चौकात त्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुशल याला औंध येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास ज्योतिबानगर, तळवडे येथे घडली.
श्रेयश अशोक परंडवाल (वय २८) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. श्रेयस हा शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून चालला होता. तो ज्योतिबानगर, तळवडे येथे आला असता भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने श्रेयस यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्रेयस यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
भिंत अंगावर पडल्याने कामगारांचा मृत्यू
भोसरी येथे जुन्या घराचे पाडकाम करीत असताना भिंत अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
गंगाराम गोपू जाधव (वय ४२, रा. गुळवेवस्ती, हनुमान मंदिराजवळ, मुरकुटे चाळ, भोसरी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाराम जाधव यांच्या घरासमोर भोंडणे यांचे जुने घर आहे. या घराचे पाडकाम सुरू होते. त्यावेळी भिंत अंगावर पडल्याने गंगाराम जाधव हे जखमी झाले. त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.